एक महिना नव्हे, तब्बल दोन वर्षांपासून बंद आहे वीज ट्रान्सफॉर्मर..शेतकऱ्यांसह गावातील नागरिकही अडचणीत

वेंकटस्वामी चकिनाला 
Thursday, 6 August 2020

नागरिक महावितरणच्या लाइनमनला वारंवार सांगून थकले आहे. पण, अद्यापही या ट्रान्सफॉरची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसह नागरिक अडचणीत आले आहेत.

अंकिसा(जि. गडचिरोली) : राज्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा तालुक्‍यातील अतिदुर्गम रंगधामपेठा येथील वीज ट्रान्सफॉर्मर एक, दोन महिने नव्हे, तर तब्बल दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे.

नागरिक महावितरणच्या लाइनमनला वारंवार सांगून थकले आहे. पण, अद्यापही या ट्रान्सफॉरची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसह नागरिक अडचणीत आले आहेत.

अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा ग्रामपंचायतीअंतर्गत रंगधामपेठा हे गाव येते. या गावात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी, या सर्वच मूलभूत सोयीसुविधांची दुरवस्था आहे. गावातील नागरिक गरीब असून प्रशासन त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. या गावात वीजपुरवठ्यासाठी दोन ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले होते. त्यापैकी एक ट्रान्सफॉर्मर मागील दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे.

सावधान! विदर्भातील पावसाबाबत हवामान विभागाने दिले हे गंभीर संकेत.. वाचा सविस्तर

सध्या एका ट्रान्सफॉर्मरवर येथील वीजपुरवठा कसाबसा सुरू आहे. येथे महावितरण कंपनीचे अशोक बोधनवार व श्रीनिवास तेरकरी हे दोन लाइनमन आहेत. या दोघांनाही गावातील लोकांनी अनेकदा सांगितले. लिखित तक्रारी दिल्या. पण, नागरिकांच्या तक्रारींना, निवेदनांना नेहमी कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली.

ट्रान्सफॉमर नादुरुस्त असल्याने येथे विजेची समस्या कायमच असते. सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. शिवाय कृषिपंप विजेवरच चालतात. पण, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने कृषिपंपांना वीज मिळत नाही. त्यामुळे शेतीच्या सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.

आता खरीप हंगाम सुरू असून यंदा पावसाने ओढ दिली आहे. योग्य पाऊस झालाच नसल्याने बोअरचे पाणी किंवा कृषिपंपाद्वारे विहिरीतील, तळ्यातील, नदी, नाल्यातील पाणी शेतांना देणे आवश्‍यक आहे.

पण, हा ट्रान्सफॉर्मर दोन वर्षांपासून दुरुस्तच न केल्यामुळे शेतकऱ्यांचे कृषिपंप बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात रोवणीसुद्धा करता येत नाही. या सर्व समस्या लक्षात घेता ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

'पुलिस को टीप किसने दिया' यावरून दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड राडा.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

प्रशासनाचे दुर्लक्ष

या गावातील समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन तसेच तालुका प्रशासनाचेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक तसेच तलाठी, प्रशासकीय अधिकारी, महावितरणचे कर्मचारी कुणीच या गावातील समस्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transformer in ankisa village had off from last 2 years