मोठ्या कष्टाने केले वृक्षारोपण; मात्र मचारणा, कवडशी मार्गावरील वृक्षे कोमेजली...आता दोष कुणाचा?

अभय भुते
Saturday, 23 May 2020

मचारणा ते कवडशी या 3 किमी अंतरावरील रस्त्याच्या कडेला सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1500 रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवड करताना एकाच खड्ड्यात 3 ते 4 रोपट्यांची लागवड केल्याचे दिसून येते. परंतु बरीचशी रोपे कोमजल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

जेवनाळा (जि. भंडारा) : सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या साकोली परिक्षेत्र योजनेअंतर्गत लाखनी तालुक्‍यात मचारणा ते कवडसीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा तीन किलोमीटर परिसरात 1500 रोपट्यांची लागवड 2018 मध्ये करण्यात आली. परंतु, यातील बरीचशी रोपटी वाळली असून अनेक रोपे कोमेजलेल्या स्थितीत आहेत. यात सामाजिक वनीकरणतर्फे संगोपन व संवर्धनाचे योग्य नियोजन नसल्याने ही वृक्षलागवड फसल्याचे दिसून येते.

जवळच्या मचारणा ते कवडशी या 3 किमी अंतरावरील रस्त्याच्या कडेला सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1500 रोपट्यांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवड करताना एकाच खड्ड्यात 3 ते 4 रोपट्यांची लागवड केल्याचे दिसून येते. वृक्ष लागवडीची संख्या खड्ड्यांप्रमाणे आहे की झाडांच्या नगाप्रमाणे हे न समजण्यासारखे आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून या योजनेवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. भविष्यातही खर्च होईल. परंतु, नियोजनाअभावी ही लावलेली झाडे वाळून मरत आहेत.

गावागावात आपसी मतभेद

झाडांना पाणी देण्याचे काम स्थानिक बचतगटांना देण्याचे ठरले होते. परंतु, लागून असलेल्या गावागावांतील आपसी मतभेदामुळे बचतगटांची निवड झाली नाही. दुसऱ्या गावातील मजूर आमच्या गावात येणार नाही, या भावनेतून मचारणा येथील ग्रामपंचायतीने रोपट्यांना पाणी देण्याचे काम बंद केले. त्या ठिकाणी पाणी घालण्यासाठी दुसऱ्या बचतगटाची नियुक्ती झाली नाही. या वादात लागवड केलेल्या रोपट्यांची मात्र होरपळ होत आहे.

वृक्षलागवडीच्या उद्देशाला हरताळ

सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे रोपट्यांना पाणी देणे गरजेचे आहे. परंतु, संगोपनाबाबत योग्य नियोजन सामाजिक वनीकरण विभागाने न केल्यामुळे ही रोपे वाळली आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीसाठी केलेला खर्च तसेच शासनाच्या वृक्षलागवडीच्या उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडेही माहिती उपलब्ध नाही. या वृक्षांचे संवर्धन योग्यप्रकारे व्हावे, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.

हेही वाचा : अखेर दोन महिन्यांनंतर उघडले हे दुकान...नागरिकांना मिळाला दिलासा

नोंदणीकृत बचतगटाची माहिती मागविली
स्थानिक महिलांना काम मिळावे या उद्देशाने आम्ही बचतगटांना पाणी वाटपाचे काम देणार आहोत. त्यासाठी तालुका अधिकाऱ्याकडून त्या गावातील नोंदणीकृत बचतगटाची माहिती मागविली आहे. ती अद्याप मिळाली नाही. तोवर स्थानिक प्रशासनाकडून सहकार्याची मागणी करत आहोत.
- अनिल मेश्राम
क्षेत्रीय वन अधिकारी, साकोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The trees on the way to Macharana, Kawadashi withered