अमरावती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश उईके यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

तालुक्‍यातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व आदिवासी बांधव एकजूट रहावा, आदिवासीची संस्कृती टिकून रहावी म्हणून दरवर्षी तालुक्‍यात आदिवासी मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम ते करीत असत. अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना सर्व सामान्यांपर्यंत अनेक योजना सतीश उईके यांनी पोहोचविल्यात. 

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतीश उईके यांचे शुक्रवारी रात्री 9.45 वाजता दुर्धर आजाराने बोरगाव धांदे येथे निधन झाले. शनिवारी सकाळी बोरगाव धांदे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षाचा मान त्यांना मिळाला होता. आदिवासी समाजासाठी अनेक सामाजिक कार्य निरंतर त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजातील उत्तम नेता हरवला आहे. 

साधा स्वभाव, नेहमी चेहऱ्यावर हास्य, प्रत्येकाला आपला वाटणारा निर्मळ मनाचा नेता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे समर्पित नेतृत्व हरपले. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील बोरगाव धांदे येथील सर्व सामान्य कुटुंबातील सतीश उईके यांनी अथक संघर्ष करून समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते.

जाणून घ्या - विचार जुळले, मन जुळले आणि ते झाले जीवनसाथी

तालुक्‍यातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व आदिवासी बांधव एकजूट रहावा, आदिवासीची संस्कृती टिकून रहावी म्हणून दरवर्षी तालुक्‍यात आदिवासी मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम ते करीत असत. अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना सर्व सामान्यांपर्यंत अनेक योजना सतीश उईके यांनी पोहोचविल्यात. 

सातत्याने केला संघर्ष

वंचित, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचा स्वभाव साधा असला तरी हाती घेतलेले काम समाजोपयोगी असेल तर त्यासाठी सदैव संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. पदाचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही. सोपविलेली पदे व जबाबदारी निष्ठेने पार पाडली.

क्लिक करा - का दिला सीबीएसई शाळांना कारवाईचा इशारा, जाणून घ्या

आदिवासी समाजाची मोठी हाणी

सतीश उईके यांच्या जाण्याने आदिवासी समाजात तयार झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. ते एक व्यक्ती म्हणून मनमिळाऊ तसेच सेवाभावी वृत्ती, निष्कलंक व्यक्तिमत्त्व होते. पक्षाविरहित काम करण्याचा त्यांनी सदोदित प्रयत्न केला. अजातशत्रू म्हणून ते सर्वसामान्यांमध्ये वावरले. त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाची मोठी हाणी झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal community leader Satish Uike passes away