मंगळवार ठरला अपघातवार 

file photo
file photo

अमरावती :  मंगळवार (ता. 11) शहरासाठी ऍक्‍सिडेंट डे ठरला. शहरात दुपारपासून सायंकाळपर्यंत अपघाताच्या पाच घटना घडल्या. चपराशीपुरा येथे एकास चिरडल्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटविला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला.अपघाताच्या मालिकेची सुरुवात भारतीय महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या पायथ्याशी झाली. शहरात येणारा ट्रक (एमएच 27 सी 0445) उड्डाणपूल चढत असताना त्याला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अन्य ट्रकची हूक अडकून मागे खेचत नेले. ट्रकमागील दुचाकी (एमएच 27 एएच 8229) ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन चेंगरली. सुदैवाने चालकाने दुचाकी सोडून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. दिलीप उत्तम खडसे (वय 50, रा. चकोटा), असे जखमीचे नाव असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

संतप्त जमावाने ट्रकमधीलच घनाने ट्रकची तोडफोड

भीषण अपघाताची दुसरी घटना चपराशीपुरा येथे जुना बायपासवरील गुरुकृपा मोटर्ससमोर दुपारी 3.15 वाजता घडली. कन्हान वाळू वाहतुकीचा 14 चाकी ट्रक (एमएच 27 बीएक्‍स 9799) चपराशीपुऱ्याकडून यशोदानगरकडे जात होता. देशीदारू दुकानापासून हाकेच्या अंतरावर ट्रकची सायकलला धडक बसली. सायकलस्वार मनोज मुलचंद नायकवाड (वय 40, रा. परिहारपुरा, वडाळी) हे ट्रकच्या समोरच्या चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाले. ते लगतच्या देशीदारू दुकानात कामाला होते. काम आटोपून ते डबा घेऊन सायकलने घराकडे निघाले होते. नागरीवस्तीतील या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकमधीलच घनाने ट्रकची तोडफोड केली. दोन-चार पोलिसांना न जुमानता ट्रकच्या केबीनमध्ये पेट्रोल शिंपडून आग लावली.

सौम्य लाठीमार

 ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी आग विझविण्यासाठी बोलाविलेल्या अग्निशमन पथकाला आग विझविण्यास मनाई करून बंबासह पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्याचा प्रकार घडताच पोलिसांनी सौम्य लाठीमाराने जमाव पांगवून स्थितीवर नियंत्रण मिळविले. तणावपूर्ण स्थितीने या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली. घटनास्थळी दंगल काबू पथक, बडनेरा, नांदगावपेठ ठाण्यासह वाहतूक शाखेची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलिस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त यशवंत सोळंके यांनी भेट देऊन पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रक जागेवरून हलविण्यासाठी क्रेन बोलाविण्यात आली. मात्र सुमारे 25 टन वाळूचा ट्रक हलविणे शक्‍य न झाल्याने वाळू जागेवर रिकामी करण्यात आली. पोलिस या अपघातस्थळी स्थिती हाताळत असतानाच बियाणी चौक येथे भरधाव ट्रकने (एमएच 27 बीएक्‍स 0645) ड्युओ दुचाकीला (एमएच 27 एके 7750) चिरडले. या अपघातात भाऊराव अंभोरे (वय 59, रा. गुरुकृपा कॉलनी) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. डॉ. पंजाबराव देशमुख चौक (पंचवटी) येथे अपघाताची घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती. 

पोलिसांची तत्परता

संबंधित ट्रकमालक पोलिसांची मर्जी न चुकता नियमित सांभाळत असल्याची माहिती आहे. नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी ट्रक विझविण्यास प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून आले.

अन्यथा भीषण स्फोट...

ट्रकची इंधन टाकी सुदैवाने घनाच्या प्रहाराने फुटली नाही किंवा ट्रकची आग त्यापर्यंत पोहोचली नाही. अन्यथा डिझेल टाकीसह टायरचा स्फोट होऊन मोठा अनर्थ घडला असता.

विद्यापीठ मार्ग झाला असुरक्षित

विद्यापीठ मार्गाने गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रक ये-जा करताना नो-एन्ट्रीची वेळ चुकविण्यासाठी भरधाव धावतात. चौकात स्टेट बॅंकेतील खातेदारांची गर्दी, विद्यापीठाकडे ये-जा करणारा कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com