"गांधी हे कुटुंब नाही देशाचे डीएनए"; वक्तव्यावरून आजी-माजी मंत्र्यांत जुंपली; वाचा काय घडले 

Twitter war between minister and former minister from Gandhi family
Twitter war between minister and former minister from Gandhi family

अमरावती :  सध्या राष्ट्रीयस्तरावर कॉंग्रेस पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असतानाच स्थानिक स्तरावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद उफाळून आला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी ट्‌विटरवरून गांधी हे कुटुंब नसून या देशाचे डीएनए आहेत, असे म्हटले आहे. त्यावर माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिल्याने आजी व माजी मंत्र्यांमध्ये डीएनएच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सद्या चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सोनिया गांधी तयार नसतील तर राहुल गांधींनी अध्यक्षपदाकरिता समोर यावे, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही, तर ते भारताचे डीएनए आहेत, असे ट्‌विट करून राहुल गांधी यांच्या नावाचे अध्यक्षपदाकरिता जोरदार समर्थन केले आहे.

दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले भाजप नेते व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या ट्‌विटला प्रत्युत्तर दिले. गांधी घराण्याचा डीएनए कॉंग्रेसजनापुरता मर्यादित आहे. कुठल्याही देशवासीयांवर तो थोपविता येणार नाही. प्रभू श्रीरामचंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासारखी थोर मंडळी आमच्या डीएनएमध्ये असल्याचे उत्तर डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. या वेळी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी व अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आजी व माजी मंत्र्यांमधील डीएनएच्या मुद्यावर रंगलेला सामना चर्चेचा विषय ठरला आहे.

राहुल गांधी यांचा नकार 

दरम्यान, विद्यमान स्थितीत सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत, तर राहुल गांधी यांनी पुन्हा या पदावर आरूढ होण्यास नकार दिला आहे. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत अद्याप पर्याय समोर आला नसतानाच सोनिया गांधी मात्र आपल्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. 

यशोमती ठाकूर राहुल ब्रिगेडच्या सदस्य 

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर पक्षांतर्गत दोन गट पडले असून गांधी कुटुंबांव्यतिरिक्त इतरांना या पदावार संधी मिळावी, असा एक मतप्रवाह आहे. तर गांधी कुटुंबच पक्षाला आधार ठरू शकते, या कुटुंबाला बलीदानाची परंपरा आहे, त्यांना देशात मानणारा मोठा वर्ग आहे, असा दुसरा मतप्रवाह आहे. दुसऱ्या मतप्रवाहाच्या नेत्यांना कुटुंबातीलच व्यक्ती अध्यक्षपदी हवा असून यशोमती ठाकूर या राहुल ब्रिगेडच्या सदस्य म्हणूनही परिचित आहेत.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com