
रवी पडवाळ हा दिग्रस-पुसद मार्गावरून पायी इसापूरकडे जात होता. यावेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तत्काळ दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्राथमिक उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : मित्रांसह गावाशेजारी नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शेतशिवारात लावलेल्या वीजतारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडीस आली. शैलेश रूपचंद राठोड (वय २७, रा. आलेगाव) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावालगत असणाऱ्या नाल्यावर आपल्या तीन मित्रांसह शनिवारी (ता. ५) शैलेश खेकडे पकडण्यासाठी गेला होता. तो घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. आलेगाव येथील शिवारात शिवदास राऊत यांच्या शेताच्या धुऱ्याला शैलेशचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची फिर्याद कवडू राठोड (वय ३६) याने बाभूळगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार अशोक गायकी हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तालुक्यातील दिग्रस-देवनगर येथील पाण्याच्या टाकीजवळील दिग्रस-पुसद मार्गावर घडली. रवी उर्फ खंडू माणिक पडवाळ (वय ३५, रा. इसापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पडवाळ हा दिग्रस-पुसद मार्गावरून पायी इसापूरकडे जात होता. यावेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तत्काळ दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्राथमिक उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक जाधव, नरेंद्र पुंड, राजू वरटी करीत आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे