esakal | थरार! लग्नानिमित्त चर्चेसाठी आलेल्या पाहुण्यांवरच वार; दोन ठार, सहा जण गंभीर जखमी

बोलून बातमी शोधा

soygaon crime

थरार! लग्नानिमित्त चर्चेसाठी आलेल्या पाहुण्यांना केले ठार, ६ गंभीर जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : बहिणीचे लग्न दहा दिवसांवर आल्याने चर्चेसाठी बोलावलेल्या मावसा व काकांवर रात्री गाढ झोपेत गोकूळ विलास राठोड (वय२४) या युवकाने कुऱ्हाडीने निर्दयपणे घाव घालत दोघांनाही क्षणार्धात यमसदनी पाठविले, तर मानसिक संतुलन बिघडलेल्या गोकुळने घरात झोपलेल्या आई-बहिणीसह, अंगणात झोपलेल्या सहा शेजारी नातेवाइकांना कुऱ्हाडीने घाव घालत गंभीर जखमी केले. सोमवारी (ता.१९) पहाटे अडीच दरम्यान घडलेल्या या निर्घृण हत्याकांडाने पुसद तालुक्‍यातील कार्ला तांड्याचा अक्षरश: थरकाप उडाला.

हेही वाचा: मुंबईतील हेवीवेट मंत्र्यांना रेमडेसिव्हीर दिले, पण नागपूरसोबत भेदभाव - फडणवीस

मृतांमध्ये मावसा मेरचंद शामा आडे (वय ६५, उपवनवाडी) व काका वसराम जेता राठोड (वय ५५, रा. कार्ला तांडा) यांचा समावेश आहे. तर कुऱ्हाडीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आई सुनीता विलास राठोड (वय ४५), बहीण अश्विनी विलास राठोड (वय १८), चुलत काका संजय जेता राठोड (वय३५), शेजारी राहणारे गणेश आनंदा जाधव (वय५०), यशोदा गणेश जाधव (वय४५) व नामदेव भाऊ राठोड (वय३४) यांना सुरुवातीला पुसद उपजिल्हा रुग्णालयात व नंतर यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

पुसद ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, पोलिस निरीक्षक मोतीराम बोडके हे ताफ्यासह सकाळी घटनास्थळी पोहोचले. बेफाम झालेल्या गोकुळला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

हेही वाचा: 'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'

आरोपी गोकुळच्या बहिणीचे लग्न कार्ला जवळच्या उपवनवाडी येथील युवकाशी जुळले होते. येत्या ३० एप्रिल रोजी हा लग्न सोहळा ठरला होता. गोकुळला वडील नसल्याने आत्याचे यजमान मेरचंद आडे यांचा तो सल्ला घेत असे. घटनेच्या सायंकाळी मेरचंद व काही नातेवाईक युवक घरी आलेले होते. मेरचंद व त्याचे काका रात्री घरी थांबले. त्याची आत्या, आई व बहीण घरातच झोपले. गेल्या एक आठवड्यापासून तो काहीसा कावरा-बावरा राहत होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. रात्री अडीचच्या दरम्यान गोकूळ अचानकपणे उठला व मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत त्याने खाटेवर झोपलेल्या मावसा मेरचंद आडे व काका वसराम राठोड यांच्या डोक्‍यावर, पाठीवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना जागीच ठार केले. दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना बेभान झालेल्या गोकुळने आई व बहिणीला कुऱ्हाडीने गंभीर जखमी केले.

हेही वाचा: भीतीमुळे खरंच ऑक्सिजनच्या पातळीत घट होतेय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

एवढ्यावरच तो थांबला नाही तर घराच्या अंगणात झोपलेल्या नातेवाईक व शेजाऱ्यांनाही जखमी केले. झोपेत घडलेल्या या भयानक प्रकाराने जखमी नातेवाईकांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून होते तर दुसरीकडे गंभीर जखमी झालेले विव्हळत होते. सैराट झालेला गोकूळ लाकडं तोडल्यासारखा हातातील कुऱ्हाडीने अंगणातील झोपलेल्या व्यक्तींवर सपासप वार करीत होता. शेवटी जागे झालेल्या बळीराम राठोड याने गोकुळच्या हातातील कुऱ्हाड पकडली. त्याला घेरण्यात आले व युवकांच्या मदतीने दोरीने खांबाला बांधून ठेवण्यात आले. आरोपीच्या या आतताई कृत्यामुळे सारेजण भांबावून गेले. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे कार्ला परिसरात खळबळ उडाली आहे.