बिनविषारी साप समजून पकडला मण्यार, दंश झाल्याने दोन सर्पमित्रांचा मृत्यू

रूपेश खैरी
Wednesday, 14 October 2020

सागर महाजन आणि राहुल समर्थ हे दोघे पांढरकवडा येथे गेले होते. येथे साप निघाल्याची माहिती मिळताच हे दोघे साप पकडण्यासाठी गेले. त्यांनी अंधारात कवड्या हा बिनविषारी साप असल्याचे समजून त्यांनी तो पकडला. पण, तो जहाल विषारी मण्यार असल्याचे पुढे आले.

वर्धा : साप पकडताना झालेल्या हलगर्जीमुळे येथील दोन सर्पमित्रांचा मृत्यू झाला. ही सोमवारी घटना रात्रीच्या सुमारास घडली. सागर महाजन आणि राहुल समर्थ, असे मृतांचे नावे असून दोघेही गोंडप्लॉट येथील रहिवासी होते.  

सागर महाजन आणि राहुल समर्थ हे दोघे पांढरकवडा येथे गेले होते. येथे साप निघाल्याची माहिती मिळताच हे दोघे साप पकडण्यासाठी गेले. त्यांनी अंधारात कवड्या हा बिनविषारी साप असल्याचे समजून त्यांनी तो पकडला. पण, तो जहाल विषारी मण्यार असल्याचे पुढे आले. येथेच या सापाने राहुलला दंश केला. पण त्याने दुर्लक्ष केले. याचवेळी या सापाने पुन्हा सागरला दंश केला. या दोघांनी या दंशाकडे दुर्लक्ष करून ते दोघे हा साप घेऊन वर्ध्यात आले. येथे घरी पोहोचताच राहुल समर्थ याचा मृत्यू झाला, तर हातून सुटलेला साप पकडण्यासाठी गेलेल्या सागर महाजनला पुन्हा त्याने दंश केला. यात त्याची प्रकृती खालावल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी...

घरी आणला साप - 

या दोघे साप पकडून घरी परत आले. यातील एक सर्पमित्र सागर महाजन याने हा साप घरी आणत पत्नी, मुलाच्या हाती दिला. मुलाने हा साप फेकल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सागरला चावा घेतल्याची माहिती आहे. यावेळी नागरिकांनी या सापाला पकडून एका डब्यात बंद केला असता त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्वच सर्पमित्र अनधिकृत - 

मध्यंतरी वनविभागाच्या वतीने सर्पमित्रांना ओळखपत्र देण्याचा आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. मात्र, त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. यामुळे वर्ध्यातील एकही सर्पमित्र अधिकृत नाही. यासंदर्भात अनेकांकडून पाठपुरावा करण्यात आला. पण, त्याचा काहीच लाभ झाला नाही. 

हेही वाचा - संस्कार भारतीचे माजी महामंत्री आणि व्हीएनआयटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विश्राम...

वनविभागाचे दुर्लक्ष -

जिल्ह्यात स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या सध्या वाढत आहे. त्यांना असलेल्या अर्धवट ज्ञानामुळे असे प्रकार घडत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून वनविभागाने रीतसर ओळखपत्र देत त्याची माहिती सर्वसामान्यांना द्यावी. 
- आशीष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर अ‌ॅनिमल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two died by snake bite in wardha