
हरिशंकर जावरकर व सुखराम दारसिंबे हे दोघे दुचाकीने हरिसालला जात होते. सिपना नदीच्या पुलावर त्यांची दुचाकी पोहोचली.
अमरावती : चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरिसालजवळील सिपना नदीच्या पुलावर शनिवारी (ता. 23) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
हरिशंकर ओंकार जावरकर (वय 43, रा. पोटीलावा) व सुखराम पुनिया दारसिंबे (वय 54, रा. बोरी) अशी मृतांची नावे आहेत. हरिशंकर जावरकर व सुखराम दारसिंबे हे दोघे दुचाकीने हरिसालला जात होते. मार्गात सिपना नदीच्या पुलावर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हरिशंकर जावरकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तातडीने गंभीर जखमी झालेल्या सुखराम दारसिंबे यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, वाटेत त्यांचासुद्धा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीकृष्ण ओंकार जावरकर (वय 43, रा. पोटीलावा) यांनी धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा - '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
गडचिरोलीत वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
भरधाव बोलेरो वाहनाने एका दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (ता. २३) रात्री १०.४५ वाजता येथील सारडा राइसमिलजवळ घडली. रमेश विश्वनाथ चुधरी (वय ५०) रा. गोकुलनगर, असे मृताचे नाव आहे. विजू हरी जवादे, रा. पुलखल, असे जखमीचे नाव आहे.
रमेश चुधरी व विजू जवादे हे दोघेही दुचाकीने पुलखलकडे जात होते. दरम्यान, सारडा राइसमिलजवळ बोलेरोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते दोघेही वाहनावरून खाली पडले. यात रमेश चुधरीचा जागीच मृत्यू झाला. विजू जवादे गंभीर अवस्थेत आहे. त्याला स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.