‘अजब चोरो की गजब कहानी’; चोरी करता करता स्वतःला केले खोलीत बंद

साईनाथ सोनटक्के
Saturday, 31 October 2020

घरात चोरट्यांनी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करीत असल्याचा संशय नागरिकांना आला. त्यानंतर मोठ्या शिताफीने घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद करून शहर पोलिसांना घरात चोरटे शिरले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दीपक चालूरकर हे सहकारी फुलझेले, दोडके, गाडगे यांच्यासोबत रात्रीच्या गस्तीवर होते. चालूरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

चंद्रपूर : घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. दाराला आतून कुंडी लावून शोधाशोध सुरू केली. घरातील आवाजावरून शेजाऱ्यांना शंका आली. लगेच घराचा दरवाजा बाहेरून लावून शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. पोलिस आल्यानंतर चोरट्यांनी स्वत:ला दुसऱ्या खोलीत बंद करून घेतले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून दोन चोरट्यांना अटक केली. हा प्रकार येथील पीएचनगरात मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

दिवसभर शहरात फेरफटका मारायचा. कुलूप असलेली घरे शोधायची आणि रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून माल लंपास करायचा, असा बहुतांश चोरट्यांचा दिनक्रम असतो. अमोल इलमकर (वय २१), ज्ञानेश्‍वर अंबोलकर (वय १९) हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्याची नोंद आहे. या दोघांनी येथील पीएचनगरातील कुलूपबंद घर शोधले. त्यानंतर रात्री त्या घरात चोरीसाठी प्रवेश केला. घराच्या दरवाजाला आतून कुंडी लावून शोधाशोध सुरू केली. रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घरातील साहित्याचा आवाज ऐकून शेजारी जागे झाले.

क्लिक करा - जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

घरात चोरट्यांनी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करीत असल्याचा संशय नागरिकांना आला. त्यानंतर मोठ्या शिताफीने घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद करून शहर पोलिसांना घरात चोरटे शिरले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दीपक चालूरकर हे सहकारी फुलझेले, दोडके, गाडगे यांच्यासोबत रात्रीच्या गस्तीवर होते. चालूरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

पोलिस आले आपण पकडले जाऊ म्हणून चोरट्यांनी घरातील दुसऱ्या खोलीत प्रवेश करून दरवाजा बंद केला. पोलिसांनी घरात शोध घेतला. त्यानंतर खोलीचा बंद दरवाजा तोडून बघताच दोन चोरटे आढळून आले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली. मात्र, त्यांच्याजवळ काहीही आढळून आले नाही. चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही

कामानिमित्त विद्या डबले या बाहेरगावी गेल्या होत्या. शेजारच्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घर गाठले. घरातील सर्व वस्तू बघितल्या. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर डबले यांनी घटनेची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बहादुरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thieves arrested from house in Chandrapur