महात्मा गांधींना अनोखी आदरांजली! अमरावतीत सलग पाच तास केली सूतकताई  

Sut Katai
Sut Katai

अमरावती ः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी आदरांजली कार्यक्रम पार पडले. यानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती अमरावती यांच्या संयुक्त वतीने सलग पाच तास सूतकताई करून महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा गांधी यांनी जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखवून सत्य, अहिंसा आणि मानवता या मूल्यांसाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार कायम प्रेरणा देणारे आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा देत ती कृतीतूनही सिद्ध केली. भारतमातेच्या या दोन्ही सुपुत्रांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय आहे. देशावर आलेल्या आपत्तीचा सामना धैर्य, संयम व विवेकाने करण्याचा मार्ग या महापुरुषांनी दाखवला आहे. त्यांचे विचार कृतीत उतरवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण योगदान देऊ या, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. 

गांधीजयंती निमित्त २५ चरख्यांवर सलग पाच तास सूत कताई करून महात्मा गांधीजींना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली. येथील औद्योगिक वसाहतीतील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या मुख्यालयात शुक्रवारी हात चरखा, पेटी चरखा, अंबर चरखा, सोलर चरखा इत्यादी विविध २५ चरख्यांवर सलग पाच तास सूत कताई करण्यात आली. यावेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आणि रजिस्ट्रार तुषार देशमुख यांनी भेट देऊन सूत कताईच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.

यावेळी जिल्हा ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी प्रदीप चेचरे तसेच संस्थेच्या अध्यक्ष रुपाली खडसे, सचिव प्रणिता किडीले, उपाध्यक्ष कल्पना शेंडोकार तसेच समितीच्या महिला सभासद मंजू ठाकरे, वर्षा जाधव, वैशाली राजुरिया आणि समितीचे कर्मचारी नेत्रदीप चौधरी, सुमित नागपुरे, अजीम शेख, निळकंठ पांडे, उमेश साखरकर, शीतल चौधरी, अश्विनी देशपांडे, कीर्ती सोनटक्‍के, मयुरी खरबडे, पूजा यादव आदी उपस्थित होते.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com