
वैरागड हे गाव लोकसंख्येने सर्वांत मोठे असलेले आरमोरी तालुक्यातील गाव आहे. या वैरागडला कधीकाळी विराटनगरी अशी ओळख होती. मात्र हीच विराटनगरी घाणीच्या विळख्यात सापडली असून तिला मुक्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर आहे.
वैरागड (जि. गडचिरोली) : महाभारतकालीन विराट राजाच्या नावावरून विराटनगरी अशी भव्य ओळख असलेल्या वैरागड येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या अफाट अस्वच्छतेमुळे या विराटनगरीचा श्वास कोंडू लागला आहे.
वैरागड हे गाव लोकसंख्येने सर्वांत मोठे असलेले आरमोरी तालुक्यातील गाव आहे. या वैरागडला कधीकाळी विराटनगरी अशी ओळख होती. मात्र हीच विराटनगरी घाणीच्या विळख्यात सापडली असून तिला मुक्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर आहे.
वैरागड हे गाव धार्मिक स्वरूपाचे असून येथे हेमाडपंती गोरजाई मंदिर, भंडारेश्वर, ईदगाह, पाच पांडव मंदिर व ऐतिहासिक वैरागड किल्ला आहे. गोरजाई येथे माना समाजाच्या वतीने दरवर्षी यात्रा भरते, तर भंडारेश्वर येथे महाशिवरात्रीला यात्रा भरत असल्याने बाहेरून भाविक येतात. तसेच प्रसिद्ध वैरागड किल्ला पाहण्यासाठी दुरदुरून पर्यटक येतात. परंतु गावात प्रवेश करताना येणाऱ्यांना घाणीचा सामना करूनच प्रवेश करावा लागतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नदीघाटाकडे जाणारा रस्ता, सती मोहल्ला ते नदीघाटाकडे जाणारा रस्ता, माळी मोहल्ला ते नदीघाटाकडे जाणारा रस्ता व कहार मोहल्ला ते नदीघाटाकडे जाणाऱ्या या रस्त्यांवर शेणखताचे खड्डे असल्याने व बैल बांधत असल्याने गावातील नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
खुद्द प्रधानमंत्र्यांनी हातात झाडू घेऊन गावे स्वच्छ करण्याचा संदेश दिला आहे. राज्यातील अनेक गावे ग्रामस्वच्छता अभियान राबवून आपला परिसर चकाचक करून आदर्श गाव ठरत आहेत. मात्र, आरमोरी तालुक्यातील वैरागड हे गाव लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत मोठे असून निधीही भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असतो. परंतु गावाचा विकास झाला नाही.
सविस्तर वाचा - व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या
अडचणीचे आव्हान
सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे गावातील लोकांसोबत संबंध असल्याने शेणखताचे खड्डे उचलण्यास अडथळा निर्माण होत होता. परंतु आता प्रशासक राजवट असल्याने गावातील रस्त्यावर असलेले शेणखताचे ढिग उचलून गाव घाणमुक्त करण्याचे आव्हान प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांसमोर आहे.
-
संपादन - अथर्व महांकाळ