चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी का दाखल केली महापौरांविरोधात एफआयआर ?

vijay vadettiwar
vijay vadettiwar

चंद्रपूर :  चंद्रपुरातील महापौर चषकाचा वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठलाही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही. एव्हाना, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नाव टाकण्यासंदर्भात विचारणाही करण्यात आली नाही. हाच धागा पकडून पालकमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत. 
त्यामुळे महापौर चषकात आता प्रोटोकॉलची चांगलीच कुस्ती रंगणार आहे. 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १५) या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून संपूर्ण चषकावर प्रोटोकॉलचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना देण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. मला न विचारता पत्रिकेत नाव टाकण्यात आले आहे. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आहे. त्यामुळे महापौर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

महापौर चषकात प्रोटोकॉलची कुस्ती
मनपा आयुक्त संजय काकडे यांनी आपण राजशिष्टाचारानुसार फायनल केलेली पत्रिका मंजूर न करता महापौरांनी स्वत:च्या मर्जीने पत्रिका तयार केली, असे सांगून यासर्व प्रकरणातून आपली सुटका करून घेतली आहे. महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा १४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. या स्पर्धा गांधी चौकातील मनपाच्या पटांगणावर, तर काही स्पर्धा विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेत होणार आहेत.

निमंत्रण पत्रिकेबाबत आयुक्तांचे कानावर हात 
१५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अध्यक्षस्थानी सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नागो गाणार, आमदार अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे यांच्या नावांचा समावेश आहे.

प्रोटोकॉलनुसार उद्घाटक म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मान मिळणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ आपल्या पक्षातील नेत्यांना खूष करण्यासाठी हा मान हंसराज अहीर यांना देण्यात आला आहे. भोंगळे, पाझारे ते कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना त्यांना स्थान देण्यात आले. तर, स्वपक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शर्मा यांना पाचारण केले आहे.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी हंसराज अहीर, तर सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे. उर्वरित सर्व मान्यवरांची नावे कायम ठेवण्यात आली आहेत. मूळात ही निमंत्रण पत्रिका प्रोटोकॉलनुसार नाही. पालकमंत्र्यांना उद्घाटनाचा मान देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पालकमंत्री याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात महापौर राखी कंचर्लावार यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

महापौर चषक २०२० या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव टाकताना आपली विचारणा करण्यात आलेली नाही. माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्यासाठी मुद्दाम हा प्रकार करण्यात आला आहे.  त्यामुळे महापौरांविरुद्ध मएफआयआरफ दाखल करणार आहे.
- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर.

निमंत्रण पत्रिका प्रोटोकॉलनुसार तयार करून पाठविली होती. मात्र, महापौरांनी आपल्या मर्जीने पत्रिका तयार केल्या आहेत.
- संजय काकडे, आयुक्त, मनपा, चंद्रपूर.

स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत घेण्यात येणा-या कार्यक्रमांची पत्रिका निमंत्रण प्रोटोकॉलनुसार आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविली जाते. मात्र, मनपा चंद्रपूरची पत्रिका प्राप्त झाली नाही.
- कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com