अख्खा गावाने गेल्या २५ वर्षांपासून केलं नाही मतदान; ग्रामपंचायत नसल्याने दाखल्यांसाठी करावी लागते कसरत 

Village in Yavatmal district did not vote from last 25 years
Village in Yavatmal district did not vote from last 25 years

बोरी अरब (जि. यवतमाळ) : लोकसभेपासून ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासनस्तरावरून जनजागृती केली जाते. तर, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील दिघोरीवासी गेल्या 25 वर्षांपासून ग्रामपंचायतीचे मतदान करीत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गावाला महसुली दर्जा असला तरीदेखील ग्रामपंचायत नसल्याने दाखल्यांसाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे.

चाणी (कामठवाडा) येथून अवघ्या हाकेच्या अंतरावर दिघोरी हे गाव आहे. पूर्वी दिघोरी, वरुड ईजारा, उमरठा व मोझर आदी गावे मिळून गट ग्रामपंचायत मोझर येथे स्थापन झाली होती. त्यावेळी ही सर्व गावे दारव्हा तालुक्‍यात समाविष्ट होती. त्यावेळी मोझरची लोकसंख्या स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध नव्हती. परिणामी सर्व गावांनी मिळून गटग्रामपंचायत तयार करण्यात आली होती. कालांतराने मोझरची लोकसंख्या स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी अनुकूल झाली. त्याच काळात दारव्हा तालुक्‍याची सीमा रेषा ठरविण्यात आली. त्यामधून मोझर हे गाव दारव्हा तालुक्‍यात समाविष्ट करण्यात आले. उर्वरित दिघोरी, वरुड ईजारा व इतर गावे यवतमाळ तालुक्‍यात समाविष्ट करण्यात आलीत. त्यामुळे मोझरला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात आला. 

यवतमाळ तालुक्‍यात गेलेल्या दिघोरी, वरुड ईजारा या गावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. मोझर गटग्रामपंचायतमधून काढण्यात आले. या बाबीला 25 वर्षांपासून जास्त कालावधी झाला आहे. मात्र, अजूनही या गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत या गावातील ग्रामस्थ मतदानाचा हक्क बजावत असले तरी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी गावातील ग्रामस्थ मतदान करण्यापासून वंचितच आहेत. मोझर ग्रामपंचायतीमधून निघाल्यानंतर आजपर्यंत या गावाला ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला नाही. दिघोरी गाव नंबर 394 आहे. 

गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 801 इतकी होती. ती आता एक हजार 200पर्यंत पोहोचली आहे. वरुड ईजारा गावाची लोकसंख्या 485 होती, ती आता 700च्यावर गेलेली आहे. दिघोरी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. गावात बंजारा व आदिवासी हे दोनच समाज वास्तव्यास आहे. 

दिघोरी व वरुड ईजारा या गावांना ग्रामपंचायतचा दर्जा मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व राष्ट्रपतींना पाठविले होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व वरिष्ठस्तरावर स्थानिक ग्रामपंचायतसाठी पत्रव्यवहार केला. परंतु, आजपर्यंत त्यांना ग्रामपंचायत मिळाली नाही. त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून दिघोरी व वरुड ईजारावाशी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानापासून वंचित आहेत. शासनच आम्हाला ग्रामपंचायतच्या मतदानापासून व गावाच्या विकासापासून वंचित करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com