संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको, नरभक्षक वाघाला ठार मारण्याची मागणी; २२ महिन्यांपासून सुरू आहे वाघाची दहशत

villagers agitation to killed the tiger in chandrapur
villagers agitation to killed the tiger in chandrapur

चंद्रपूर : जिल्ह्यातील मध्य चांदा वन विभागाअंतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तात संतप्त शेतकऱ्यांनी आज 12 ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता  राजुरा येथे रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या विरोधात नारेबाजी केली. नरभक्षक वाघाला ठार मारा व वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलेल्या वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तत्काळ निलंबित करा यांसह अनेक मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वनविभागाची झोप उडाली.

शेतकरी शेतमजूर समन्वय समिती, टेंभूरवाई या बॅनरखाली चेतन जयपूरकर, बाबुराव मडावी यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार अ‌ॅडव्होकेट संजय धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, महीपाल मडावी, दीपक मडावी, गंगाधर कन्नाके, लक्ष्मण पेदोर, खुशाल राऊत, तुळशीराम आत्राम यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होते.

पंचायत समिती चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. तहसील कार्यालयासमोर वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली व काही काळ चक्काजाम आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. उपविभागीय वनाधिकारी कल्याणी यांनी शेवटी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

जवळपास २२ गावातील शेकडो शेतकरी  आंदोलनात सहभागी झाले होते. प्रमुख मागण्यांमध्ये नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना वन विभागात सामावून घ्या. या शासकीय मदत 25 लाखांची करण्यात यावी. जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास तत्काळ मदत देण्यात यावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

मागील २२ महिन्यापासून राजुरा व वीरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. यात दहा शेतमजूर व शेतकऱ्यांचा बळी गेला. मात्र, तब्बल २२ महिन्यापासून वाघाला जेरबंद करण्यास वन विभाग अपयशी ठरलेय. शेतकरी हवालदिल आहेत. खरीप हंगाम असून सुद्धा शेतावर जाणे बंद आहे. वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भीतीमध्ये जीवन जगत आहेत. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेला, असा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वाघ जेरबंद करण्यासाठी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे मागील नऊ महिन्यापासून सुरू असलेली मोहीम केवळ दिखावा ठरलेला आहे. या मोहिमेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, वाघाला जेरबंद करता आले नाही. हे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे अपयश आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

विशेष पथकात  200 कर्मचारी 160 कॅमेरा दोन शूटर यांच्यासह डॉक्टर व अधिकारी या मोहिमेत जुळलेले आहेत. आतापर्यंत या मोहिमेवर किती खर्च झाला याचाही शोध वन विभागाने द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून केवळ वन विभागाने कागदी अहवाल सादर केॉला आहे. त्यामुळे वाघ मोकाट आहे व शेतकरी, शेतमजुरांचा बळी जात आहे. वाघ जेरबंद करण्याच्या मोहिमेत सहभागी अधिकाऱ्यानी केवळ जंगलामध्ये पार्ट्या करून मौजमजा केल्याचा घणाघाती आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष बाबुराव मडावी यांनी केला आहे. वन विभागाला वाघाचा बंदोबस्त करता येत नसेल तर शेतकऱ्यांना अधिकार द्यावा, असेही ते म्हणाले.

२५ लाख शासकीय मदत करावी -
वाघाचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयातील वारसदारांना वन विभागातील शासकीय नोकरीत घ्यावे. शासकीय मदत 25 लाख करण्यात यावी. दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.

चेतन जयपूरकर, अध्यक्ष, समन्वय समिती 

आंदोलनास आमदार सुभाष धोटे यांनी भेट दिली.  वनविभाग व आंदोलनकर्ते शेतकरी यांच्यासोबत चर्चा करून नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी सात दिवसांचा कालावधी वनविभागास देण्यात आला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com