हस्तलिखित सातबारा नाकारणे पडले महाग, आमदार अग्रवाल यांनी ग्रेडरच्या लगावली कानशिलात

मुनेश्‍वर कुकडे
Sunday, 6 December 2020

जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू होण्यास आधीच विलंब झाला. त्यामुळे अल्पभूधारक व पैशाची नितांत आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. यात मात्र, खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन अवाजवी भावात धान खरेदी करीत होते. 

गोंदिया : ऑनलाइन सातबाराची अट शिथिल झाली असताना शेतकऱ्यांना वेठीस धरून पाठविणाऱ्या एका ग्रेडरला चांगलेच महागात पडले. संतापलेल्या आमदार विनोद अग्रवाल यांनी खरेदी केंद्र गाठून ग्रेडरच्या कानशिलात लगावली. तालुक्यातील मुंडीपार येथे चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा - विजय वडेट्टीवार यांच ‘एक तीर दो निशान’; उदयनराजेंच्या निमित्ताने फडणवीसांना हाणला टोला

जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू होण्यास आधीच विलंब झाला. त्यामुळे अल्पभूधारक व पैशाची नितांत आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. यात मात्र, खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन अवाजवी भावात धान खरेदी करीत होते. दरम्यान, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात धान खरेदी त्वरित सुरू व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना विनंती केली. आमदार अग्रवाल यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत धान खरेदीसाठी ऑनलाइनची अट शिथिल करून हस्तलिखित सातबाऱ्यावर धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार, ऑनलाइनची अट शिथिल करून हस्तलिखित सातबाऱ्यावर धान खरेदी करणे सुरू झाले. मात्र, मुंडीपार येथील खरेदी केंद्रात ऑनलाइन सातबाऱ्याशिवाय हस्तलिखित सातबारा घेतला जात नव्हता, अशी माहिती असून, आणखी अव्यवस्था असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा - कार्यालयाच्या चकरा मारत कागदपत्र जमविले, पण मिळाले...

हस्तलिखित सातबारा आणलेल्या शेतकऱ्यांना परत पाठविले जात होते. याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार अग्रवाल यांच्याकडे केल्या. त्यामुळे संतापलेल्या आमदार अग्रवाल यांनी खरेदी केंद्र गाठत ग्रेडरच्या कानशिलात लगावली. या घटनेची तक्रार करण्यात आली नसली तरी, कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral video of mla agrawal slap to grader in gondia