समृद्धी महामार्गाने पळविलं विद्यार्थ्यांच्या हक्काचं पाणी, पाण्यावाचून होताहेत हाल

सुरेंद्र चापोरकर
Friday, 22 January 2021

अखेर समृद्धी महामार्गाच्या यंत्रणेने पोलिस बंदोबस्तात बुलडोझर फिरविल्याने शाळेतील मुलांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व महाराष्ट्र रस्तेविकास महामंडळाला नोटीस बजावण्यात आल्यावरसुद्धा त्यांनी त्याची कोणतीच दखल घेतली नाही.

अमरावती : फासेपारधी समाजाची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत यासाठी त्यांच्या शिक्षणाची सोय करून देणाऱ्या मतीन भोसले या तरुणाच्या समस्या कमी होण्याचे नावच घेत नाही. मंगरूळचव्हाळा येथील 'प्रश्‍नचिन्ह' शाळेच्या बाजूला असलेल्या विहिरीवर गुरुवारी अखेर समृद्धी महामार्गाच्या यंत्रणेने पोलिस बंदोबस्तात बुलडोझर फिरविल्याने शाळेतील मुलांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व महाराष्ट्र रस्तेविकास महामंडळाला नोटीस बजावण्यात आल्यावरसुद्धा त्यांनी त्याची कोणतीच दखल घेतली नाही.

हेही वाचा - भाजपमध्ये लवकरच फाटाफूट! ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा पक्षाला राम-राम करण्याचा...

मतीन भोसले यांनी नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील मंगरूळचव्हाळा येथे आदिवासी फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी 'प्रश्‍नचिन्ह' ही शाळा सुरू केली आहे. याठिकाणी राज्याच्या विविध भागांतील मुले शिक्षणासाठी निवासी स्वरूपात आहेत. त्यांना लागणाऱ्या पाण्यासाठी मतीन भोसले यांनी शाळेपासून ५० फूट अंतरावर विहीर खोदली. या विहिरीपासून काही अंतरावर समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून ही विहीर मार्गात येत असल्याचे कारण पुढे करून ती बुजविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे भोसले यांचे म्हणणे आहे. ही विहीर बुजविल्यास विद्यार्थ्यांच्या पाण्याची व्यवस्था नष्ट होईल. तसेच रस्ता दूर असल्याने विहीर बुजविण्याची आवश्‍यकता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. असे असतानाही विहीर बुजविण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आधी संबंधित यंत्रणेला सात जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, ते हजर झाले नाहीत. त्यानंतर बुधवारची तारीख देण्यात आली. त्यालासुद्धा कोणीच हजर नव्हते व गुरुवारी अचानक अमरावती तसेच नांदगावखंडेश्‍वर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त लावून ही विहीर जेसीबीच्या साहाय्याने बुजविण्यात आल्याचे भोसले यांचे म्हणणे आहे. मुले तहानलेली राहू नयेत यासाठी सध्या लोकवर्गणीतून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असल्याचे भोसले म्हणाले. 

हेही वाचा - तुरुंग अधीक्षकांनी झडती घेताच थरथरू लागला कर्मचारी, नंतर समोर आली धक्कादायक माहिती

आम्ही न्यायालयात असताना त्यांनी विहीर बुजविली. आम्हाला कोणतीच नोटीस किंवा माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता न्यायालयात हा लढा लढण्यात येईल. 
- मतीन भोसले, मंगरूळ चव्हाळा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: well fill up with soil in prashnachihna ashram school for samrudhhi highway in amravati