
आश्रमशाळेत समाजातील मुख्य प्रवाहापासून दुरावलेले चिमुकले शिक्षण घेत आहेत. मात्र, आश्रमशाळेला पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर आहे. ती विहीर समृद्धी महामार्गाच्या रस्त्यात येत असल्याने ती बुजविण्याबाबत संचालकांना नोटीस देण्यात आली.
अमरावती : समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराची अरेरावी पुन्हा समोर आली आहे. मंगळवारी (ता. पाच) पहाटेच्या सुमारास कंत्राटदार कंपनीचा जेसीबी, पोकलॅण्ड तसेच टिप्परचा फौजफाटा प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या परिसरात दाखल झाला आणि तेथील विहीर बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविल्याने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. प्रशासनाकडून कुठलीही मदत होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हेही वाचा - समाजमन सुन्न! गणपती-पुळेला जाण्यासाठी निघाले तरुण, पण वाटतेच काळाचा घाला; एकाच...
मंगरूळ चव्हाळा परिसरात आदिवासी फासेपारधी सुधार समितीअंतर्गत मतीन भोसले यांच्याद्वारे प्रश्नचिन्ह आश्रमशाळा चालविण्यात येते. या आश्रमशाळेत समाजातील मुख्य प्रवाहापासून दुरावलेले चिमुकले शिक्षण घेत आहेत. मात्र, आश्रमशाळेला पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर आहे. ती विहीर समृद्धी महामार्गाच्या रस्त्यात येत असल्याने ती बुजविण्याबाबत संचालकांना नोटीस देण्यात आली. मात्र, त्याविरोधात मतीन भोसले यांनी न्यायालयात धाव घेतली. पर्यायी व्यवस्था होईस्तोवर विहीर बुजविण्यात येऊ नये, अशी याचिका त्यांनी दाखल केली. त्यावर सात जानेवारीला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे, असे असले तरी कंत्राटदारांच्या लोकांनी मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आश्रमशाळेच्या परिसरात जेसीबी, पोकलॅण्ड तसेच टिप्परचा फौजफाटा आणला व विहीर बुजविण्यास सुरुवात केली. आवाजामुळे प्रश्नचिन्हचे काही कार्यकर्ते जागे झाले आणि त्यांनी त्याला विरोध दर्शविला. एवढेच काय तर या विहिरीतच आत्महत्या करू, असा इशारा दिला. त्यामुळे कंत्राटदारांची माणसे मागे फिरली. तरीदेखील सुरुवातीला काही प्रमाणात मुरूम विहिरीत टाकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हेही वाचा - दीड महिन्यांपासून पिलाला शोधत होती आई; एकमेकांना...
न्याय मागायचा कुणाला? -
यासंदर्भात आम्ही वारंवार जिल्हाधिकारी तसेच अनेक मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. वेळोवेळी आश्वासने देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही काहीच झाली नाही. आज विहीर बुजविण्यासाठी कंत्राटदाराची माणसे येऊन गेलीत. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावा?, असा प्रश्न मतीन भोसले यांनी उपस्थित केला.