विहिरी तुडुंब, मात्र विजेचा खेळखंडोबा; महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

सायराबानो अहमद 
Saturday, 21 November 2020

विहिरीत पाणी आहे, पण ते पाणी पिकासाठी केवळ विजेअभावी वापरता येईना, अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने पाहून वीज पुरवठा सुरळीत कसा होईल, यासाठी प्राधान्य द्यावे, अशीच अपेक्षा बळीराजाची आहे.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) ः मुबलक पावसामुळे विहिरी अगदी तुडुंब भरल्या असल्या तरी शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी वीज मिळत नसल्याने त्यांच्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विजेच्या लपंडावामुळे शेतकरी वर्ग आतापासूनच वैतागु लागला आहे. त्यामुळे तालुक्‍यात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात, उपकेंद्रात आंदोलनाचे शस्त्र उगारले जात आहे.

विहिरीत पाणी आहे, पण ते पाणी पिकासाठी केवळ विजेअभावी वापरता येईना, अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने पाहून वीज पुरवठा सुरळीत कसा होईल, यासाठी प्राधान्य द्यावे, अशीच अपेक्षा बळीराजाची आहे.

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

आता बळीराजा रब्बीच्या पिकाच्या पेरणीस मग्न आहे. गहू, हरभरा, आदी पिके पेरण्यास शेतकरी व्यस्त आहे. सुदैवाने विहिरी तुडुंब भरल्या, मात्र विजेचा खेळखंडोबा सुरू झाल्याने बळीराजा आतापासूनच वैतागु लागला आहे. रब्बीच्या पिकाचे आणखी चार महिने किती कठीण जातील, याची कल्पनाच न केलेली बरी. आत्तापासूनच रोहित्र बिघाडाच्या घटना घडू लागल्या आहे. विहिरीवरील मोटार चालू केल्यानंतर वाफ्यात पाणी येत नाही, तोच कृषिपंप बंद पडू लागले आहेत.

वीज वितरण कंपनीकडून दिवसा व रात्र असे दोन टप्प्यात शटडाऊन आहे. दिवसा तर विहिरीवरील मोटारी व्यवस्थित चालत नाही, मात्र रात्रीच्या पाळीतही दिवसासारखीच विजेची परिस्थिती होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अधिक वाचा - ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुना धामणगाव येथे नवीन पावर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत, शेतातील विजेचा अनियमितपणा, सिंगल फेज याबाबत आमदार प्रताप अडसड यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पक्षातर्फे ठिय्या देवून सहाय्यक अभियंता श्री. डेरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, श्‍याम गंधे, राजेंद्र गोपाळ, प्रमोद ढाले, ओमप्रकाश लाहोटी, नरेंद्र ढाले, राजेंद्र महात्मे, शेखर बोरकर, नरेंद्र व्यवहारे, वैभव देशमुख, संजय ढाले, सुनील महात्मे, संजय कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wells are full but no electricity in farms