कुंभारांचे चाक रुतले; माठही येऊ शकले नाहीत आकाराला!

मनोज भिवगडे
Thursday, 23 April 2020

भिरभिरणाऱ्या चाकांवर कच्च्या मातीला आकार देणाऱ्या हातांचा रोजगारच कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनने हिरावला आहे. उन्हाळ्यात सुकलेल्या गळ्याला गार पाणी देणाऱ्या माठांचा सिजन गेला. आता अक्षय तृतियेलाही व्यवसाय करण्याची परवागनी मिळाली नाही तर कुंभार समाजातील गाडगे-मडकी तयार करणाऱ्या कुटुंबांचा वर्षभराच्या दानापाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.

अकोला : भिरभिरणाऱ्या चाकांवर कच्च्या मातीला आकार देणाऱ्या हातांचा रोजगारच कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनने हिरावला आहे. उन्हाळ्यात सुकलेल्या गळ्याला गार पाणी देणाऱ्या माठांचा सिजन गेला. आता अक्षय तृतियेलाही व्यवसाय करण्याची परवागनी मिळाली नाही तर कुंभार समाजातील गाडगे-मडकी तयार करणाऱ्या कुटुंबांचा वर्षभराच्या दानापाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.

भारतात बाराबलुतेदारांची पद्धत फारपूर्वी अस्तित्वात होती. काळासोबत व्यवहारातून ती कालबाह्य होत असली तरी आजही भारतीय समाज या बाराबलुतेदार व्यवस्थेच्या चाकोरीतच बराच अंशी टिकून आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आजही या बाराबलुतेदारांवरच फिरत असते. अर्थातच त्याचे स्वरुप बदलले आहे. याच बाराबलुतेदार व्यवस्थेतील एक घटक कुंभार समाज आहे. देशभरातील लॉकडाउनचा प्रभार इतर घटकांसोबतच या समाजावरही पडला आहे. उन्हाळ्यात गार पाण्यासाठी वापरले जाणारे माठ, विट भट्ट्या आणि भारतीय संस्कृतीतील विविध सनासुदीसाठी वापरले जाणारी गाडकी, मटकी, दिवे, पणत्या तयार करून ठेवण्याचा काळा म्हणजे, डिसेंबर ते मार्च. त्यामुळे सुरुवातीला कच्चे माठ व गाडगी तयार करून ठेवणाऱ्या कुंभार समाजाला या नंतर लॉकडाउनमुळे आवश्‍यक साहित्य खरेदी न करता आल्याने या माठांना आकारच देता आला नाही. उन्हाळ्याचा व्यवसाय कोरोनाने खाल्ल्यानंतर आता किमान अक्षय तृतियेला तरी व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा या समाजाने व्यक्त केली आहे.

 

वाचा ः  सॅनिटेशन टनल  वापरता,मग हे वाचाच...

जिल्ह्यात नऊ हजारावर कुंभार व्यावसायिक
अकोला जिल्ह्यात कुंभार समाजाची लोकसंख्या 26 हजारांवर आहे. यातील 9 हजारांवर समाजबांधव आजही पारंपरिक गाडगे-मटके बनविण्याच्या व्यवसायात आहेत. त्यांच्या कुटुंबाचा वर्षभराचा खर्च याच व्यवसायावर अवलंबून असतो. आधुनिक यंत्रांमुळे आधीच त्यांचा व्यवसाय डबघाईस आल्याने आता कोरोनाने त्यांची चाकेच रुतून बरली आहेत. तयार मालही बाजारात आणता आला नाही. त्यामुळे वर्षभराचा दानापाणी कसा गोळा करून ठेवावा, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला आहे.

अक्षय तृतीयेचा व्यवसाय बुडणार
उन्हाळ्याचा व्यवसाय बुडाल्यानंतर आता अक्षय तृतियेला तरी व्यवसाय करता येईल, अशी अपेक्षा होती.मात्र लांबलेल्या लॉकडाउनने त्यावरही पाणी फेरले आहे. अक्षय तृतियेच्या काळात सरासरी प्रत्येक कुटुंबाला 50 हजारांपर्यंत व्यवसाय होतो. ही तुटपुंजी कमाईसुद्धा शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास बुडणार आहे.

 

महत्त्वाचे ः मौत, हयात अल्लाह के हात मे है...

शासनाकडे व्यवसायाची मागणी
ग्रामीण व शहरी भागांमध्ये सहा महिन्यांपासून काम करणाऱ्या कुंभार समाज बांधवांच्या रोजगार संधीसाठी दोन दिवस वेळेची मर्यादा घालून, विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे केली आहे.

कुटुंब आर्थिक अडचणीत
कुंभार समाजातील पारंपरिक व्यवसाय करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. डिसेंबरपासून त्यांचा व्यवसाय सुरू होतो. मेपर्यंत चालणाऱ्या या व्यवसायातून वर्षभराचा कुटुंबाचा प्रपंच चालतो. याच काळात व्यवसास झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुंभार समाजाची कुटुंब अडचणीत आहे. शासनाने त्यांना मदत केली नाही, तर पुढचे सर्वच प्रश्‍न गंभीर होणार आहे.
- संजय वाडकर, जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज महासंघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wheel of the potter is turned; Couldn't even come to size in Akola district