(Video) विश्‍वास बसेल का 'व्हाइट हाउस'मधून चालतो चक्क पोंभूर्णा नगरपंचायतचा कारभार

white house
white house

चंद्रपूर : 'व्हाईट हाऊस' अमेरिकन राष्ट्रध्यक्षांचे निवासस्थान आणि कार्यालय. याठिकाणी घेतलेले निर्णय अनेकदा जगावर बरेवाईट परिणाम करतात. मात्र व्हाइट हाउसफमधून नगर पंचायतचा कारभार चालतो, असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. त्यासाठी तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा या दुर्गम भागातील पाच हजार लोकसंख्येच्या शहरात यावे लागले. येथे अगदी हुबेहुब व्हाइट हाऊसची भव्य प्रतिकृती आहे. याच इमारतीतून शहराचा कारभार चालतो. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थानाच्या धर्तीवर बांधलेली विदर्भातील ही एकमेव शासकीय इमारत आहे.


चंद्रपूर जिल्ह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर पोंभूर्णा हे आदिवासीबहुल शहर आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील हे छोटेसे शहर आहे. पाच वर्षांआधी येथे ग्रामपंचायत होती. मुनगंटीवार यांनीच 17 जून 2015 रोजी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर केले. मुनगंटीवारांकडे युतीच्या शासनाच्या काळात राज्याची तिजोरी होती. त्यांनी याचा आपल्या मतदारसंघासाठी सढळ हाताने वापर केला. पोंभूर्णा उद्योगविरहित तालुका आहे. आदिवासी शेतकरी आणि शेतमजुरांचे हे गाव आहे.

येथील आदिवासींना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात. शहराचा चेहरामोहरा बदलवावा, यासाठी नवीन प्रशासकीय इमारत मुनगंटीवारांनी मंजूर करून घेतली. मात्र, शासकीय कार्यालयासारखी रटाळ, उदास इमारत नको. इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटले पाहिजे. काम करण्याचा आणि वाट बघण्याचा त्रास कुणालाही होऊ नये, अशी देखणी वास्तू उभारण्याचा निर्णय मुनगंटीवारांनी घेतला. त्यातूनच व्हाइट हाऊसची भव्य प्रतिकृती पोंभुर्णात निर्माण झाली.

या इमारतीत नगर पंचायतचे कार्यालय आहे. अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज अशी ही इमारत आहे. पोंभूर्णा येथे दुमजली घर बघायला मिळत नाही. या इमारतीत लिफ्ट लावण्यात आली आहे. आता शेतकरी आदिवासी सुद्धा लिफ्टचा वापर सराईतपणे करतात.


अद्ययावत इमारत
नगरपंचायत सभागृह, नागरिकांना बसण्याकरिता अभ्यागत कक्ष, पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था, स्वच्छ सुंदर प्रसाधन गृहे, प्रशासकीय तसेच नागरिकांच्या सभा घेण्याकरिता शंभर आसनाचे वातानुकुलीत सभागृह. विशेष म्हणजे हरित इमारत संकल्पनेवर आधारित या इमारतीमध्ये नैसर्गिक प्रकाश व्यवस्थेकरिता आतील भागात घुमट तयार करण्यात आले. ज्यातून नैसर्गिंक प्रकाश येऊन विजेचा खर्च कमी होतो. तसेच इमारतीमध्ये समोरील भागात पारदर्शक काचेची व्यवस्था करण्यात आली आहे. नैसर्गिक हवा खेळती राहावी याकरिता खिडक्‍या व व्हेंटीलेटर लावण्यात आले. छतावर सौरऊर्जा संयंत्र लावण्यात आले. जेणेकरून वीजनिर्मिती होईल. तसेच छतावरील पाणी जमिनीत जिरवण्याकरिता रेनवॉटर हार्वेस्टींग केले आहे. इमारत चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.

मोतीया रंगाची ही इमारत दिवसा जेवढी सुंदर दिसते. त्यापेक्षा जास्त रात्री चंद्रप्रकाशात आणि नगरपंचायतीने केलेल्या रोषणाईत ताजमहाल प्रमाणे खुलून दिसते. या इमारतीसमोर असलेला बगीचा या इमारतीचे सौंदर्य अधिक खुलवतो. या बगीच्यामध्ये पोंभुर्णा शहरातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतक्‍यांच्या सुंदर कलाकृती लावण्यात आल्या आहेत. तसेच इमारतीच्या आतील भागात शेतकरी व शेतमजूर आधारीत संकल्पनेवर सौंदर्यीकरण केले आहे. या इमारतीचा वर्षपूर्ती सोहळा येत्या 13 सप्टेंबर रोजी होईल. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबद्दल जगभरातील लोकांना कुतूहल आहे. मात्र पोंभूर्णावासीयांना वेगळाचा अभिमान आहे. ते गर्वाने सांगतात आमच्याही गावचा कारभार व्हाईट हाऊसमधूनच चालतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com