देशाला मंगळसूत्र दान करणाऱ्या शांता आजी काळाच्या पडद्याआड; गरीब परिस्थितीतही दिले देशभक्तीचे धडे

woman who donated mangalsutra to country is no more
woman who donated mangalsutra to country is no more

दर्यापूर (जि. अमरावती) ः देशावर प्रेम करणाऱ्यांना परिस्थितीचे भान नसते. चार लहान मुलांचा सांभाळ करताना केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या, प्रसंगी एकवेळ भोजनाची व्यवस्था कशीबशी करणाऱ्यांनी देशाप्रती दान देणे ही बाब पचनी पडणार नाही. मात्र, जुन्या दर्यापुरातील शांताबाई शंकरराव रेखे या एक देशभक्त गृहिणी होत्या, त्यांनी आपले मंगळसूत्र देशासाठी दान केले. काल त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

1962 च्या भारत-चीन युद्धाचा तो काळ होता. लग्न होऊन केवळ 6-7 वर्षे झाले असतील. घरची परिस्थिती अगदी बेताची, केवळ 12 एकर शेती, चार लहान मुले, देश युद्धाच्या खाइत लोटलेला, अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे देश पूर्णतः हादरून गेला होता. युद्धाच्या बातम्या केवळ रेडियोच्या माध्यमातून मिळायच्या. सैन्याला मुबलक पुरवठा करण्याची तयारी देशातील प्रशासनात नव्हती, देशातील अंतर्गत स्थितीसुद्धा भयावह होती. अन्नधान्याचा भयंकर तुटवडा होता, त्यावेळी देशाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. 

माझा देश संकटात आहे

ती मदत सैन्याला जाणार होती. पती शंकरराव सामाजिक कार्यात अग्रेसर होते. शांताबाई यांनी ते आवाहन रेडियोवर ऐकले, देशाला मदत करायचीच म्हणून मनाशी पक्‍के केले, पण देणार काय? पैसा नाही, सोने नाही की धान्य नाही. गरीब स्थितीत देशभक्ती कशी करावी? मोठा प्रश्‍न पडला. गळ्यात केवळ डोरले-मणी असलेले मंगळसूत्र होते, संसारातील महिलेचा एकमेव दागिना म्हणजे मंगळसूत्र. ते देता येणार नाही, म्हणून सगळ्यांनी दटावले पण तिकडे माझा देश संकटात आहे म्हणून व्याकूळ झालेल्या शांताबाईंनी कुणाचेच ऐकले नाही. 

मंगळसूत्र दिले देशाला दान 

त्याकाळी दर्यापुरात असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना त्या भेटल्या, शांताबाईंनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून साहेबांच्या पुढ्यात ठेवले, सारेच अवाक्‌ होऊन बघू लागले, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारत रसीद दिली. शांताबाईंची देशभक्ती बघून अगोदर हसणारे अधिकारी आता खुर्चीतून उठून आदर करू लागले, त्यावेळी सत्कारसुद्धा करण्यात आला.

 ही बाब वरिष्ठ स्तरावर कळताच त्यावेळेसच्या मंत्र्यांना दखल घ्यावी लागली. युद्धाचे ढग ओसरल्यावर पुढील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शांताबाईंना आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले, देशभक्त शांताबाई रेखे यांनी पुढील आयुष्यात आपल्या परिवाराला देशभक्तीचा वसा दिला, वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी शुक्रवारी (ता.16) हा देश सोडला.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com