महिला क्रिकेटपटूने मध्यरात्री दाखवले धाडस!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

सलोनीने चक्‍क एका चोरट्याचा धैर्याने सामना करीत, त्याला पोलिसांच्या स्वाधिन करून समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला. पोलिसांनीही सलोनीच्या हिंमतीला दाद देत या धाडसाबद्‌दल तिचे कौतुक केले.

नागपूर : विदर्भाची युवा महिला क्रिकेटपटू सलोनी अलोट, ही तिच्या मैदानावरील धमाकेदार कामगिरीसाठी संपूर्ण विदर्भात लोकप्रिय व परिचीत आहे. मात्र रविवारी पहाटे नागपूरकरांना तिचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. सलोनीने चक्‍क एका चोरट्याचा धैर्याने सामना करीत, त्याला पोलिसांच्या स्वाधिन करून समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला. पोलिसांनीही सलोनीच्या हिंमतीला दाद देत या धाडसाबद्‌दल तिचे कौतुक केले.

आणखी वाचा - प्रेमाच्या आणाभाका एकीशी, लग्न मात्र दुसरीशीच...शिक्षिकेची फसवणुक

गिट्‌टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी कॉलनीत राहणारी सलोनी आपल्या आईवडिलांसह कारने शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गिट्‌टीखदान परिसरातच राहणाऱ्या आपल्या मामाकडे एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ती घरी परतली. सलोनी घराच्या बाजूला कार "पार्क' करीत असताना अचानक अंधारात फुलांच्या कुंडीजवळ काहीतरी हालचाल झाल्याचे दिसून आले.

ती जवळ गेली असता चोरीच्या इराद्‌याने आलेला एक भामटा नजरेस पडला. घाबरलेल्या चोरट्याने "वॉल कंपाऊंड'वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंमतवान सलोनीने लगेच पाठलाग करीत त्याची गच्ची पकडली. जवळपास दहा मिनिटे सलोनीने चोरट्याला पकडून ठेवले. सलोनीच्या आईवडिलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. लगेच गिट्‌टीखदान पोलिसांना फोन केल्यानंतर त्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. या झटापटीत सलोनीच्या दोन्ही हातांना जखम झाली. परंतु, तिने चोरट्याला सोडले नाही.

हेही वाचा - अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीने दिला मृत बाळाला जन्म, नंतर घडले असे काही

वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गांगुर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिवाय सलोनीने दाखविलेल्या धाडसाबद्‌दल तिचे कौतुकही केले. अंधाऱ्या रात्री चोरट्याचा नीडरपणे सामना करणे याला खुप हिंमत लागते, खेळाडू होती म्हणूनच ती अशी हिंमत करू शकली, असे गांगुर्डे म्हणाले. या धाडसी कामगिरीबद्‌दल कॉलनीतील नागरिकांनी सलोनीची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याची पोलिसांकडे मागणी केली. धनराज पंचेश्‍वर (बालाघाट) असे चोरट्याचे नाव आहे.

 

धनराजला पकडले त्यावेळी त्याच्याजवळ आरी, पेचकस व अन्य तीक्ष्ण साहित्य होते, हे उल्लेखनीय. केमिकल इंजीनियरिंग करीत असलेली सलोनी यष्टीरक्षक असून असून, 2018-19 च्या मोसमात तिने 26 सामन्यांमध्ये यष्टीमागे 37 बळी टिपले होते. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सध्या तिने क्रिकेटपासून तात्पूरता "ब्रेक' घेतला आहे. क्रिकेटपासून दूर असली तरी, तिच्यातील लढवय्येपणा कुठेही कमी झाला नाही. त्याचे उत्तम उदाहरण रविवारच्या घटनेतून पाहायला मिळाले. महिलांसाठी ती निश्‍चितच "रिअल लाइफ हिरो' ठरली आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women cricketer show courage at Midnight