महिलांच्या जिद्दीला सलाम; दारूविक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या, वाचा सविस्तर

अमित साखरे
Friday, 28 August 2020

गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांच्या उपस्थितीत २१ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. याप्रसंगी महिलांनी गावात पुन्हा दारूविक्री करू देणार नाही, असा एकमताने निर्णय घेतला.

चामोर्शी (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मुरखळा माल येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत गावात पुन्हा दारूविक्री करू देणार नाही, असा ठराव महिलांनी एकमताने संमत केल्यानंतर लगेच कृती करीत एका अवैध दारूविक्रेत्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चामोर्शी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपीचे नाव राकेश सुरेश गोविंदकर, असे आहे.

मुरखळा माल येथे गाव संघटनेच्या महिलांनी अथक परिश्रम घेऊन गावातून दारू हद्दपार केली. मात्र, गावातील काही दारूविकेत्यांनी डोके वर काढत छुप्या मार्गाने दारूची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे गावात तंट्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. याचा त्रास महिलांना सहन करावा लागत होता.

जाणून घ्या - रोजगार मिळावा म्हणून विकली वडिलोपार्जित शेती.. पण पैसे देताच बाहेर आले धक्कादायक सत्य; नक्की काय घडले

या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांच्या उपस्थितीत २१ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. याप्रसंगी महिलांनी गावात पुन्हा दारूविक्री करू देणार नाही, असा एकमताने निर्णय घेतला.

दारूमुळे आरोग्यावर दुष्परिणाम

दरम्यान संचालक डॉ. गुप्ता यांनी गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाची भूमिका काय, दारूमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विशद केले. त्यानंतर महिलांनी अहिंसक कृती करीत गावातील दारूविक्रेत्यांच्या पाच घरांची व शेतशिवारातील अड्ड्यांची तपासणी केली. मात्र कोणाकडेच दारू आढळून आली नाही.

हेही वाचा - राणे फॅमिली सुसाईड मिस्ट्री: अजून एक ट्टिस्ट; मृत धीरजची आई अचानक प्रगटली .. केले हे गंभीर आरोप

३० लिटर मोहफुलाची दारू केली जप्त

मात्र दुसऱ्या दिवशी महिलांनी पुन्हा कृती करीत गावातील दारूविक्रेता राकेश गोविंदकर याच्याकडून ४ हजार ५०० रुपये किमतीची ३० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी आरोपीवर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

महिलांच्या पुढाकाराने दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे इतर दारूविक्रेत्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ व बिट जमादार चिंचोळकर यांनी केली. यावेळी तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते.

असे का घडले? - मोठी बातमी: राणे प्रकरणात अचानक ट्विस्ट.. घटनेला अनैतिक संबंधाची किनार? ही माहिती आली समोर

दुकानदारावर गुन्हा दाखल

मुलचेरा येथील किराणा दुकानात तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी तालुक्‍यातील शांतीग्राम येथील दुकानदारावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम अनिल बिस्वास (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. शांतीग्राम येथे कायद्याचे उल्लंघन करीत तंबाखूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच गावसंघटनेने गावातील १५ दुकानांची तपासणी करून त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेतले.

संपादन : दुलिराम रहांगडाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The women handed over the liquor dealer to the police