"या' गावातील महिलांना भर उन्हात करावी लागते पाण्यासाठी पायपीट 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा या समस्येची दखल घेतली नाही. यामुळे शनिवारी (ता. 24) शेकडो संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर धडकले. या वेळी त्यांनी प्रशासनाकडे पाइपलाइन दुरुस्त करण्याची मागणी केली.

येवली (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या येवली गावात भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. 

गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत येवली येथे पाणीपुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आली. परंतु, निकृष्ट दर्जाचे बांधकाम तसेच वारंवार पाइपलाइन दुरुस्तीची समस्या भेडसावत असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच नवीन पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट बांधकामामुळे नवीन पाणीपुरवठा योजना बंद करावी लागली. त्यामुळे येवलीवासींना जुन्याच पाण्याच्या टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. अशातच मागील चार महिन्यांपासून येवली गावात काही भागात पाण्याचा पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

अवश्य वाचा- पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने भंडाऱ्यात खळबळ

गावातील पाणीपुरवठा बंद

वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा या समस्येची दखल घेतली नाही. यामुळे शनिवारी (ता. 24) शेकडो संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर धडकले. या वेळी त्यांनी प्रशासनाकडे पाइपलाइन दुरुस्त करण्याची मागणी केली. पाइपलाइन दुरुस्त करीत नसेल तर गावातील संपूर्णपाणीपुरवठाच बंद करण्याचा आग्रह धरला. 
अखेर प्रशासनाने गावातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे गावातील ज्या भागातील पाइपलाइन योग्य आहे, तो भाग तसेच ज्या भागातील पाइपलाइन फुटली आहे, त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ टंचाईग्रस्त भागातील पाइपलाइन दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. 

सरपंचाचा कालावधी पूर्ण झाल्याने येवली ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभार माझ्याकडे आला. या गावात नव्यानेच रुजू झालो. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येबाबत काहीही माहिती नाही. माहिती घेऊन पाणीप्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 
-श्री. बोपणवार, प्रशासक, ग्रामपंचायत, येवली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women in the Yeoli village Wandering for water