
माथाडी कामगारांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेपासून बाजार समितीमधील व्यवहार प्रभावित झाले आहेत. स्थानिक माथाडी कामगारांनी परप्रांतीय माथाडी कामगारांना बाजार समितीबाहेर काढावे, अशी मागणी केली आहे
अमरावती ः परप्रांतीय माथाडी कामगारांना बाजार समितीबाहेर काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर स्थानिक हमाल कामावर परतलेत. मात्र खरेदीदारांनी परप्रांतीयांना कामावरून काढण्यास नकार दिल्याने गतिरोध अजूनही कायम आहे. दरम्यान, बाजार समितीत दोन हजार पोत्यांचा लिलाव झाला, मात्र त्यानंतर लिलावाची प्रक्रिया पुन्हा रखडली. सभापती अशोक दहीकर व उपसभापती नाना नागमोते यांनी पेच सुटला असून लिलाव सुरळीत होत असल्याचे म्हटले आहे. पुढील आदेशापर्यंत शेतकऱ्यांनी आवक आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
माथाडी कामगारांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेपासून बाजार समितीमधील व्यवहार प्रभावित झाले आहेत. स्थानिक माथाडी कामगारांनी परप्रांतीय माथाडी कामगारांना बाजार समितीबाहेर काढावे, अशी मागणी केली आहे. तर, खरेदीदारांनी त्यास विरोध केला आहे. परप्रांतीय माथाडी कमी पैशांत अधिक काम करीत असल्याचा त्यांचा दावा असून त्यांनी या माथाडींना आश्रय दिला आहे. या वादात तोडगा काढण्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरू लागले आहेत.
बुधवारी सकाळी लिलावास सुरवात करण्यात आली. अडत्यांनी सोयाबीनच्या लिलावास सुरवात केली. सोयाबीन व तुरीच्या दोन हजार पोत्यांचा लिलाव झाला व दोन तीन खरेदीदारांनी हा शेतमाल विकत घेतला. अडते पुढील लिलाव पुकारणार एव्हढ्यात हमालांनी पुन्हा कामबंदचे शस्त्र उगारल्याने लिलावात अडचणी निर्माण झाल्यात. हमाल व खरेदीदारांमध्ये पुन्हा वाद झाला. अखेर खरेदीदारांनी लिलाव बंद पाडून तेथून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही शेतमालाचा लिलाव पूर्ण होऊ शकला नाही.
सभापती अशोक दहीकर यांनी मात्र लिलाव सुरळीत सुरू झाल्याचा दावा केला असून समितीच्या यार्डात असलेल्या सर्व शेतमालाचा लिलाव होईस्तोवर नवीन आवक स्वीकारणार नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन केले आहे.
व्यापारी संचालक नापास
बाजार समितीत खरेदीदार अडते व व्यापारी यांचे प्रतिनिधित्व करणारे संचालक आहेत. तसेच माथाडी कामगारांचेही प्रतिनिधित्व करणारे संचालक आहेत. पेचप्रसंगातून तोडगा काढण्यात उभयतांचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. दोन्ही गटातील संचालकांची या प्रकरणातील भूमिका बघ्याची ठरली असून ते नापास झाले आहेत, अशी चर्चा बाजार समितीत रंगली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ