मिल सुरू करा, तरच उपोषण मागे! अचलपूरचे कामगार उतरले रस्त्यावर... 

राज इंगळे
Friday, 11 September 2020

कोरोनाच्या संकटात गेल्या पाच महिन्यांपासून फिनले मिल बंद आहे. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

अचलपूर (जि. अमरावती) ः जुळ्या शहरातील सर्वांत मोठा उद्योग असलेल्या फिनले मिल सुरू करण्यासोबतच कामगारांना शंभर टक्‍के वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी गिरणी कामगार बेमुदत साखळी उपोषणाला मिल परिसरात बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मिल सुरू होत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नसल्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. 

कोरोनाच्या संकटात गेल्या पाच महिन्यांपासून फिनले मिल बंद आहे. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. असे असतानाही फिनले मिल व्यवस्थापनाकडून कामगारांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापैकी अनेक कामगारांना १५०० ते २००० रुपये इतके कमी वेतन मिळते. तरीसुद्धा मिल प्रशासन कामगारांना पूर्ण वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. राज्यासह देशात मागील दोन महिन्यांत विविध उद्योग सुरू झाले. असे असतानाही फिनले मिल सुरू करण्यास विलंब केला जात आहे. 

अवश्य वाचा- आम्हाला दगू द्या, आमची आर्थिक लूट थांबवा
 

कामगारांना अनलॉकनंतर पूर्ण वेतन न देता अर्ध्या महिन्याचे वेतन देण्यात येत आहे. केंद्राकडून अशा गाइडलाइन आहेत, असे सांगण्यात येत असल्याने कामगारांनी मिल प्रशासनाविरुद्ध बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे मिलच्या कामगारांनी सांगितले. त्यामुळे फिनले मिलबाबत एनटीसी आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

अवश्य वाचा- वेदनादायक डॉक्टरचाच उपचाराविना मृत्यू
 

कामगारांना मिल प्रशासनाने शंभर टक्‍के वेतन देऊन तत्काळ फिनले मिल सुरू करावी, अन्यथा कामगारांच्या हितासाठी मनसे रस्त्यावर उतरून मिल प्रशासनाला धडा शिकवण्यात मागेपुढे पाहणार नाही. 
- विवेक महल्ले, मनसे पदाधिकारी. 

कामगार काम करायला तयार आहेत. ते फुकटचा पगार मागत नाहीत. शिवाय केंद्र सरकारची कुठलीच गाइडलाइन नसताना मिल प्रशासनाने कामगारांचे वेतन ५० टक्‍क्‍यांवर आणले आहे. जोपर्यंत सर्वच कामगारांना १०० टक्‍के वेतन आणि मिल सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. 
- गजानन कोल्हे, भाजप पदाधिकारी. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The workers of a mill is on Strike at Achalpur. They demand to Start mill