यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपवाल्यांनी पक्षाच्या नेत्यांच्या कारनाम्यांविषयी बोलावे

अतुल मेहेरे
Friday, 16 October 2020

माझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे. अशा लहानमोठ्या घटनांवरून त्यांनी आमच्या कामांत कितीही अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही विचारांची लढाई लढत राहणार. भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारनाम्यांविषयी बोलावे.

नागपूर : अमरावती न्यायालयाने काल जो निकाल दिला, त्यावर जास्त बोलणार नाही. पण त्या निर्णयावर आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. तेथे नक्कीच न्याय मिळेल, याचा विश्‍वास आहे. आठ वर्ष जुने एक प्रकरण होतं. त्यावरून आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे नावाच्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला थापड मारल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने यशोमती ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तीन महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी मंत्री ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

त्यावर आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून मीडिया आणि लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आता हे लोक अकांडतांडव करतील, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

माझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे. अशा लहानमोठ्या घटनांवरून त्यांनी आमच्या कामांत कितीही अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही विचारांची लढाई लढत राहणार. भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारनाम्यांविषयी बोलावे. जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी काय दिवे लावले, किती भ्रष्टाचार केला, याबाबत त्यांच्याच नेत्यांना ते प्रश्‍न का विचारत नाही, असा सवाल मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

२४ मार्च २०१२ रोजीची घटना

२४ मार्च २०१२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर चार साथीदारांसह टाटा सफारीने चुनाभट्टी मार्गाने जात होत्या. वनवे असल्यामुळे ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस कर्मचारी उल्हास रौराळे यांनी त्यांना या मार्गाने जाण्यास विरोध केला. आधी वाहनचालकासह तिघांनी खाली उतरून वाहतूक पोलिस रौराळे यांच्यासोबत वाद घातला. परंतु, ते आपल्या कारवाईवर ठाम होते. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी खाली उतरून रौराळेंसोबत वाद घातला व त्यांना रस्त्यावर थापड मारली. झटापटीत पोलिसाचे कपडेही फाटले होते. त्याप्रकरणी रौराळे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार केली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashomati Thakur told BJP