यशोमती ठाकूर उच्च न्यायालयात मागणार दाद; जामीन झाला मंजूर   

अतुल मेहेरे
Thursday, 15 October 2020

२०१२ ला वाहतूक पोलिस कर्मचारी रौराळे यांनी तेव्हाच्या आमदार आणि विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना गाडी पुढे नेण्यास मज्जाव केला होता.

नागपूर ः अमरावतीच्या अंबादेवी मंदिराजवळ पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निकालानंतर लगेच जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकरणी निर्दोष असल्याचा दावा करत  यशोमती ठाकूर उच्च न्यायालयात जाणार आहेत अशी माहिती समोर येतेय. 

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

२०१२ ला वाहतूक पोलिस कर्मचारी रौराळे यांनी तेव्हाच्या आमदार आणि विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना गाडी पुढे नेण्यास मज्जाव केला होता. त्यांचा वाहनचालक आणि कार्यकर्त्यांची पोलिस कर्मचाऱ्यासोबत बाचाबाचीही झाली होती. दरम्यान ॲड. ठाकूर यांनी गाडीतून उतरून रस्त्यावरच रौराळे यांना थापड मारली होती.

त्यानंतर वाहतूक पोलिस कर्मचारी रौराळे यांनी पोलिस ठाण्यात ॲड. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर आज त्याचा निकाल लागला. 

हेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

यामध्ये ॲड. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तीन महिन्याची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर ‘सरकारनामा’ला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, न्यायालयाचा निर्णय आम्ही आदराने स्वीकारला आहे. पण त्या प्रकरणात आम्ही निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yashomati thakur will asked for justice at high court