चला मेळघाटात! हरिसाल निसर्ग संकुलातील झोरबी बॉलची पर्यटकांना भुरळ; लुटता येणार मनसोक्त आनंद 

Zorbie Ball in Harisal Nature park in Melghat
Zorbie Ball in Harisal Nature park in Melghat

अचलपूर (जि. अमरावती) ः मेळघाटात व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने पर्यटकांसाठी नवनवीन व्यवस्था निर्माण केल्या जात असल्याने मेळघाट पर्यटकांना भुरळ घालतो आहे. या आधी जंगल हत्ती सफारी, आमझरी येथील ऍडव्हेंचर स्पोर्टस त्या पाठोपाठ आता हरिसाल येथे झोरबी बॉलची व्यवस्था करण्यात आल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या झोरबी बॉलचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले हरिसालकडे वळत आहेत. या नवीन झोरबी बॉलची सुविधा 13 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.

मेळघाटात दरवर्षी पर्यटक नदीतील नौका विहार व आदिवासी संस्कृतीच्या दर्शनासाठी हरिसालला येत असतात. मात्र आता व्याघ्रप्रकल्पाने पाण्यावर तरंगणारा झोरबी बॉलची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने या बॉलमध्ये जलविहार करण्यासाठी पर्यटकांची पावले हरिसालकडे वळत आहेत. 

या झोरबी बॉलमध्ये खेळण्याची मजा काही वेगळीच असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्याकडे आकर्षित होत आहेत. पर्यटकांना आता हरिसाल येथे जंगल सफारी, नौका विहार सोबतच झोरबी बॉलचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने पर्यटकांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना सिपना नदीच्या पात्रात संथ वाहणाऱ्या अथांग पाण्यावर झोरबी बॉलचा आनंद लुटता येणार आहे.

या व्यवस्थेमुळे प्रामुख्याने साहसी खेळात रस असणाऱ्यांना सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. सध्या हरिसाल येथील उपलब्ध असलेल्या सुविधांचा आनंद घेण्यासाठी जवळपास दोनशेच्या वर पर्यटकांनी हजेरी लावली असल्याची माहिती मिळाली आहे.

जंगल सफारीसह झोरबी बॉलचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमींसाठी हरिसाल परिक्षेत्र कार्यालयाकडून राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच प्रकृती व संस्कृती प्रेमींसाठी नौका विहार, जंगल सफारी, औषधी वनस्पती रोपवाटिका आणि आदिवासी संस्कृती व दिनचर्येच्या दर्शनाची विशेष व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी हरिसाल येथे एकदा आवश्‍य भेट द्यावी.
-प्रफुल्ल ठाकरे
वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी हरिसाल.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com