esakal | कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप

कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर (जि. यवतमाळ) : लग्न जुळल्यावर भावी वधूसह सुखी आयुष्याची स्वप्न रंगवत असताना तिनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने नियोजित वराला शीतपेयातून विष देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयात उपचार घेत वराने मृत्यूवर विजय मिळविला. बरे होताच थेट पोलिस ठाणे गाठून त्याने तक्रार दिली. त्यामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

किशोर परसराम राठोड (वय 23, रा. कोहळा) असे घातपातातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने गेल्या शनिवारी (ता. एक) बाभूळगाव तालुक्‍यातील भावी वधू व इतर तिघांनी संगनमत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची लेखी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. किशोर हा आई, वडील व भावासह कोहळा येथे राहत असून, शेतीचा व्यवसाय करतो. बाभूळगाव तालुक्‍यातील एका गावातील मुलीसोबत त्याचा विवाह 19 एप्रिलला ठरला.

लग्नाची तारीख लगेच निघाल्याने दोन्ही बाजूने लग्नाची धामधूम सुरू झाली. किशोर हा पत्रिका वाटप करण्यासाठी नेर येथे आला असता, भावी वधू, तिचा भाऊ व मैत्रिणीसह नेर येथे दाखल झाले. तिने आपल्या होणाऱ्या पतीस फोन लावून नेर येथील माळीपुरास्थित कोल्ड्रिंक दुकानात बोलावले. स्टेशनरीच्या खरेदीसाठी तीन हजार रुपये मागितले. नवऱ्या मुलाने कसलाही विचार न करता तत्काळ तीन हजार रुपये काढून दिले. सर्वांनीच किशोरला शीतपेय घेण्याचा आग्रह करीत ऑर्डर दिली.

बोलत असताना लक्ष विचलित करून शीतपेयात काही तरी टाकून दिले. नात्याची शपथ देत ते पिण्यास भाग पाडले. उरलेले शीतपेय मुलीने आपल्या बॅगमध्ये ठेवून दिले. काही वेळाने मुलाची प्रकृती बिघडली. उपचारानंतर बरे होताच शनिवारी नेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भावी वधू, तिचा भाऊ व मैत्रिणीने संगनमत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. त्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे करीत आहेत.

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तेरा दिवस उपचार

शीतपेय घेतल्यावर किशोर आपल्या मित्रासह गावाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाला असता, आजंती रोडवरील स्वागत मंगल कार्यालयाजवळ येताच चक्कर येऊन खाली पडला. मित्राने लगेच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्‍टरांनी यवतमाळला हलविण्याचा सल्ला दिला. यवतमाळातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी विषबाधा झाल्याचे सांगितले. तब्बल 13 दिवसांच्या उपचारानंतर किशोर बरा झाला.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image