esakal | धर्मभेदापलीकडे वारीची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

देहूगाव - सात पिढ्यांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारी करणाऱ्या अत्तार कुटुंबातील सदस्य. (डावीकडून) साहिल अत्तार, शाकीर अत्तार, दिलशाद अत्तार, शबाना मणेर (भाची) आणि सुहेल अत्तार (मुलगा).

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत दरवर्षी वडील वारीला जातात. मी मित्रांसोबत पुण्यापर्यंत जायचो. या वर्षी पंढरपूरपर्यंत जाणार आहे. 
- साहिल अत्तार, देहू 

धर्मभेदापलीकडे वारीची परंपरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - धर्मानं मुस्लिम. व्यवसाय हिंदू देवतांच्या मूर्ती, प्रतिमा व पूजा साहित्य विक्री. दुकानाचे नाव ‘सौभाग्य अलंकार.’ त्याच्या फलकावर लिहिलंय ‘जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज प्रसन्न.’ मालकाचे नाव शाकिर अत्तार. उत्सुकता म्हणून चौकशी केली आणि कळलं, की वर्षानुवर्षे अत्तार कुटुंब देहूत राहतंय. महाद्वारालगत त्यांचं दुकान. गेल्या सहा पिढ्यांपासून कुटुंबातील कर्ता पुरुष आषाढी वारी करतोय. अखंडपणे. यंदा सातव्या पिढीतील तरुण साहिल वडिलांसोबत वारीला जाण्याच्या तयारीत आहे. त्याचं वय अवघं २२ वर्षे.

संत तुकाराम महाराज आणि त्यांचं देहूगाव म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. तीर्थक्षेत्र. श्रद्धास्थान. सध्या येथे आषाढीवारी पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देहूत जाण्याचा योग आला. इंद्रायणी नदीलगतच्या चौदा टाळकरी प्रवेशद्वारातून मुख्य मंदिराकडे (देऊळवाडा) जाताना डाव्या बाजूला ‘सौभाग्य अलंकार’ दुकान दिसले. २२-२३ वर्षांचा तरुण दुकानात होता. प्रस्थान सोहळा व त्या दिवसाबाबत चौकशी केली. बोलता बोलता विषय परिचयावर आला. त्याचे नाव सुहेल अत्तार.

नावावरूनच लक्षात आलं की, मुस्लीम कुटुंबातील तरुण. मग, दुकानाच्या नामफलकावर ‘संत तुकाराम महाराज प्रसन्न’ असं कसं काय? आणि दुकानात हिंदू देवतांच्या मूर्ती व प्रतिमासुद्धा. 

अत्तार कुटुंबाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुहेलचे वडील शाकिर अत्तार म्हणाले, ‘‘आमच्या सहा पिढ्या येथे झाल्यात. माझी मुले सुहेल व साहिल. सातवी पिढी. वडील अब्दुल अत्तार व आजोबा मोहंमद अत्तार दरवर्षी आषाढी वारीला जायचे. एकादशी व्रत करायचे. वडिलांनंतर मी वारी सुरू केली. पणजोबा मोहंमद अत्तार, त्यांचे पणजोबा अब्दुल अत्तार. त्यांचे संत तुकाराम महाराज मंदिराच्या महाद्वारासमोरच मूर्ती व पूजा साहित्य विक्रीचे दुकान होते. त्यासाठी महाराजांचे वंशज इनामदार बाबांनी दुकानासाठी जागा दिली.’’ वारीच्या अनुभवाबाबत ते म्हणाले, ‘‘पायी वारीचा आनंद वेगळाच असतो. जातिभेद विसरून सर्व जण एकतेचा संदेश देतात. वारी हा एक भावनिक सोहळा आहे. एकदा तरी प्रत्येकाने वारीला जावे व सोहळा अनुभवावा.’