जाता पंढरीशी, सुख वाटेल का जीवा ?

‘जाता पंढरीशी, सुख वाटे जीवा‘ या पंक्तीनुसार साऱ्या विश्‍वाला भुलवणारे दक्षिण काशी पंढरपूरमध्ये वास्तव्य व चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी सुखाची वाटण्यापेक्षा असहनीय होण्यासारखी स्थिती असते.
Ashadi wari 2022 namami chandrabhaga campaign devotee of vitthal pandharpur
Ashadi wari 2022 namami chandrabhaga campaign devotee of vitthal pandharpur sakal
Summary

तत्कालिन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या काळात आखलेल्या योजनांची अंमलबजावणी झाली तरी ‘डेस्टीनेशन पंढरी़' किंवा ‘टुरिस्ट पंढरी‘ योजना होऊन विकासाला चार चांद लागतील आणि येथील वास्तव्य करणाऱ्या भाविकांना खरंच ‘सुख वाटे जीवा‘ वाटेल

‘जाता पंढरीशी, सुख वाटे जीवा‘ या पंक्तीनुसार साऱ्या विश्‍वाला भुलवणारे दक्षिण काशी पंढरपूरमध्ये वास्तव्य व चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी सुखाची वाटण्यापेक्षा असहनीय होण्यासारखी स्थिती असते. राज्यात सत्तांतर झाले अन् पुन्हा भाजप व सेनेचे (बंडखोर) राज्य आले. गेल्या टर्ममध्ये भाजपप्रणित सत्ताधिशांची ‘नमामी चंद्रभागा‘ योजना हवेतच विरलेली आहे. तर विकासाच्या दृष्टीने अध्यात्मिक पंढरीत अजून कामांचा डोंगर शिल्लक आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या काळात आखलेल्या योजनांची अंमलबजावणी झाली तरी ‘डेस्टीनेशन पंढरी़' किंवा ‘टुरिस्ट पंढरी‘ योजना होऊन विकासाला चार चांद लागतील आणि येथील वास्तव्य करणाऱ्या भाविकांना खरंच ‘सुख वाटे जीवा‘ वाटेल.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाच्या पंढरीत भरणाऱ्या चार वाऱ्यांवेळी होणारी गर्दी कोरोनामुळे गेली दोन वर्षे खंडीत झाली होती. वारीअभावी पंढरीचे अर्थचक्र ठप्प होते. यंदा त्यात प्रचंड उत्साह संचारला असून ती वाढू लागली आहे. यावर्षीची वारी १२ ते १५ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आतापर्यंतच्या प्रशासनाने पंढरपूरचा विचार चार वाऱ्यांचे ‘इव्हेंट'पुरताच मर्यादित केला आहे. परंतु पंढरपूर शहरात दररोजच येणारे भाविक, वारकरी व पर्यटकांचा विचार करुन विकासाच्या योजना आखल्या जाण्याची गरज होती. तत्कालिन जिल्हाधिकारी श्री. मुंडे यांनी त्याचे नियोजन केले होते. त्यांनी पंढरपूर, अक्कलकोट व तुळजापूर यांचा अध्यात्मिक सर्किट म्हणून विकास करण्यास सुरवात केली होती. अक्कलकोटमधील उघड्या गटारी बंद करून पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग योजना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून केली. पंढरपुरातील उघड्या गटारी, ड्रेनेजची सुविधा, घाण पाणी चंद्रभागेत मिसळू नये यासाठी पाण्यावरील प्रक्रिया योजना पूर्ण केली. ६५ एकरवर वारकऱ्यांसाठीच्या सुविधा देण्याचे नियोजन त्यांचेच होते. त्यांच्या नंतर मात्र शासन व प्रशासन पातळीवर कोणतीच हालचाल झाली नसल्याचे दिसून येते. कागदावरील योजना पूर्ण झाल्यास अर्थचक्राची गती आणखी वाढेल.

पंढरपूर, अक्कलकोट, शेजारचे तुळजापूर व गाणगापूर (कर्नाटक) असे अध्यात्मिक पर्यटन होण्याच्या दृष्टीने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढणे अपेक्षित आहे. या भाविकांना येथे रहावे, पर्यटनाच्या दृष्टीने फिरणे सुलभ व्हावे, यासाठी शासनाने विकासाची कवाडे उघडण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी कायमस्वरुपी उड्डाणपूल उभारला आहे. त्याचे निम्मे कामही झाले आहे. तो उड्डाणपूल गोपाळपूरपर्यंत नेण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. तिरुपतीच्या धर्तीवर गोपाळपूर पत्राशेडजवळच सर्व सुविधांनीयुक्त असा कायमस्वरुपी दर्शन मंडप बांधण्याचे नियोजन आहे. यालाच पैलतिरावरून हँगींग पूल जोडल्यास वारकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. त्या दृष्टीने समिती काम करत आहे. परंतु ते नियोजन अजून तरी कागदावरच आहे.

नमामी चंद्रभागा योजना

गेल्यावेळच्या म्हणजे युती शासनामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रभागेच्या शुद्धीकरणाबरोबरच पंढरपूरच्या विकासाच्या योजना आखल्या होत्या. याची जबाबदारी तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्यावर सोपविली होती. प्रचंड गाजावाजा करत पंढरपुरात मोठा कार्यक्रम घेऊन या योजनेचे सादरीकरणही झाले होते. नंतर सरकार बदलले. महाआघाडी सरकारने याकडे दुर्लक्षच केले. परंतु आता पुन्हा एकनाथ शिंदे व श्री. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार सत्तारुढ झाले असल्याने पंढरपूरकरांबरोबरच राज्यातील वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुढील अडीच वर्षात विकासाच्या दृष्टीने काहीतरी हालचाल होईल अशी अपेक्षा आहे.

विकासापासून दूर राहिलेल्या योजना

तत्कालिन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी पंढरपूर विकास आणि वारी या संदर्भात विविध योजना आखल्या होत्या. त्यातील ६५ एकरचा विकास हा एक भाग होता. तो पूर्ण झाला आहे. सध्या त्याचा उत्तम उपयोग होत आहे. त्याला जवळची रेल्वेची ३५ एकर जागा घेऊन तो शंभर एकरावर नेऊन विकसित करण्याचा मानस होता. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु होते. नदीच्या दोन्ही बाजूंचे काठ विकसित करुन त्याचे नैसर्गिक रुप आणखी देखणे करायचे. पंढरपुरातील शिंदेवाड्यासमोरून नदीच्या पैलतिरापर्यंत हँगिंग ब्रिजची योजना होती. नदीपलिकडील वारकरी या माध्यमातून शिंदेवाड्याजवळ उतरेल व थेट मंदिराकडे जाईल. यामुळे पंढरपुरातील गर्दी आपोआप कमी होऊन चेंगराचेंगरीसारखे अनुचित प्रकार होणार नाहीत. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकरी पंढरीत येतात. परंतु स्नानासाठी या काळात नदीत पाणीच नसायचे. श्री. मुंडे यांनी तातडीने तीन महिन्यात बंधारा बांधून पाणी थांबविले. त्याचा वारकऱ्यांना फायदाच झाला. यापुढील विकासासाठी पाटबंधारे विभागातर्फे ५०० कोटींची निविदा प्रक्रियाही झाली होती. पंढरपुरात प्रदूषण होऊ नये यासाठी इलेक्ट्रीक व्हेईकलचाही विचार केला गेला होता. या सर्व योजना नंतर बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या. त्यामुळे ‘टुरिस्ट-डेस्टीनेशन पंढरपूर' हे दिवास्वप्नच रहिले. ड्रेनेजचे काम, घाण पाणी शुद्धीकरण योजना पूर्ण झाली. पंढरपुरात येणारे वारकरी व निवास सुविधा यात खूप तफावत असते. त्यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी भक्त निवास योजना राबविली ती मात्र पूर्ण झाल्याची समाधानाची बाब आहे. मुंडे पॅटर्नच्या सर्व योजना सध्या ठप्प असून या योजनांना नव्या सरकारच्या कालावधीत मूर्त स्वरुप येण्याची अपेक्षा आहे.

ठळक...

- चंद्रभागेत घाण पाणी जावू नये यासाठी भुयारी गटार योजनेचे तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण

- तुळशी वन उद्यान विकसित

- पंढरपुरात २५ हजार ९४१ शौचालये, दोन हजार प्रिफॅब्रिकेटेड शौचालये उपलब्ध

- पर्यटन विकासासाठी अंतर्गत रस्ते विकासाचे काम सुरु

- ‘नमामी चंद्रभागा‘ योजनेला गती देण्याची गरज

- वारकऱ्यांसाठी विसावा किंवा निवारा केंद्राच्या उभारणीची गरज

- पंढरपूर विकास प्राधीकरणास चालना देण्याची गरज

- प्रलंबित स्काय वॉक व दर्शन मंडपाची योजना पूर्णत्वाची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com