esakal | कोरोनामुळे आषाढी वारीतील लाखोची उलाढाल होणार ठप्प!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona will cause a turnover of lakhs in Ashadhi Wari

महाराष्ट्राचा महासोहळा म्हणजे आषाढी एकादशी, चंद्रभागेच्या पात्रात स्नान आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन हे एक समीकरण. मात्र, यंदा कोरोना व्हायरसचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  त्याला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. म्हणून लॉकडाउन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी सुरू असल्याने आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे.

कोरोनामुळे आषाढी वारीतील लाखोची उलाढाल होणार ठप्प!

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : महाराष्ट्राचा महासोहळा म्हणजे आषाढी एकादशी, चंद्रभागेच्या पात्रात स्नान आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन हे एक समीकरण. मात्र, यंदा कोरोना व्हायरसचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  त्याला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. म्हणून लॉकडाउन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी सुरू असल्याने आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे.

१ जुलैला यावर्षी आषाढी एकादशी आहे.
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मानाच्या नऊ प्रमुख पालकांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या प्रवास करून पंढरपूरकडे येत असतात. यामुळे प्रशासनाला अडीच महिन्यांपासून नियोजन करावे लागते.  
प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्त्व अधिक मानण्यात येते. या वर्षी बुधवारी १ जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते. 
वारकरी संप्रदायाचा मानबिंदू असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस उरी बाळगणाऱ्या शेकडो किलोमीटर पायपीट करत दरवर्षी आषाढीला राज्यभरातून रवाना होतात. परंतु यंदा करोना महामारीमुळे वारी रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेकडो वर्षांची दिंड्या पालख्यांची ही परंपरा खंडीत होणार आहे. आषाढ महिन्यातील एकादशीला पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. या महिन्यातील एकादशी ही अत्यंत आनंदाची असते. पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसच्याकोस पावसा भिजत जाणाऱ्या वारकरी भक्तांचा दिंडीचा सोहळा अत्यंत मनोरम असा असतो. महाराष्ट्रातून तीन लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची "चंद्रभागे"च्या काठी जत्रा भरते. सर्व जाती- जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णवधर्मच होय.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या भागांतून येतात पालख्या

एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची,  देहूहून तुकारामाची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथाची, सासवडहून सोपानदेवाची, पैठणहून एकनाथांची व उत्तर भारतातून कबीराची पालखी निघते. 

२० वारकऱ्यांबरोबराबर...
पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळ्यावर करोनाचे सावट आहे. यंदा आषाढी वारी फक्त २० वारकऱ्यांच्या सोबत करा. असा प्रस्ताव आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचवला आहे. दशमीला संतांच्या पालख्या वाहनातून आणणार असून याबाबतचे निर्णय शासन ३० मे पर्यंत देणार असल्याची माहिती पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार अभय जोशी यांनी सांगितली आहे.

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यासह छोट्या- मोठ्या १०० ते १५० पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे दरवर्षी मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र यावर्षी पंढरपूर वारीवर करोनाचे सावट आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी ही घरूनच पंढरीच्या विठूरायला नमस्कार करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : नीरा खोऱ्यातील धरणात मुबलक पाणी तरीही उजवा कालव्यावरील पिके करपली 
प्रमुख नऊ पालख्यांसह असतात लाखो भाविक

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख नऊ पालखी आहेत. यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत सोपान महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री संत निळोबाराय महाराज, आदी पालख्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगना या भागातून लाखो वारकरी असतात.

या गजरांनी दुमदुमते पंढरी
'टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, च्या गजराने पंढरपुर नगरी दुमदुमून जाते.‌ परंतु यंदा या गजरांचा आवाज वारकऱ्यांच्या कानांवर ऐकू येणार नाही.

वर्षभरातील २४ एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी.  शतकानुशतके शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्टपुर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. १८०० वर्षांपासून अधिक काळ ही वारी सुरु आहे.

वारीत होते या वस्तूंची लाखोंची उलाढाल
तुळशीच्या माळा, चिरमुरे, शेव, शेंगदाणे, पेढे, प्रसाद, देवदेवतांचे फोटो, लहान खेळणी, सोलापूरच्या चादरी, घोंगडी, पितळ दगडांच्या मूर्ती, चंदन, बुक्का, अष्टगंध, कुंकू, लाखेच्या बांगड्या या वस्तूंची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.

यास म्हणतात 'यजमान कृत्य'
आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा दिली जाते. दरवर्षी काहींचे मुक्कामासाठी ठरलेली घरे असतात. ते लोक दर्शन घेऊन जाताना गावकऱ्यांना ठराविक रक्कम देऊन जातात. यालाच पंढरपुरात 'यजमान कृत्य' असे म्हणले जाते.

वारीवरच असतो अनेकांचा उदरनिर्वाह
वर्षभरातील मानली जाणारी मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या दिवसांमध्ये गोरगरिबांचे कमवण्याचे दिवस. या लोकांचे जीवन वारीवरच अवलंबून असते. अनेक लहान मोठे वस्तू बनवून विकण्याची कामे वर्षानुवर्षे अनेक लोक करत आहेत. परंतु सध्या लॉकडाउनमुळे वारी होत नसल्याने अनेकांना आपला उदरनिर्वाह होणार कसा, हा प्रश्न भेडसावत आहे.

मुद्दे

  • - पंढरीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी दहा ते बारा लाख वारकऱ्यांची उपस्थिती
  • - दोन दिवसात होते २०-२२ कोटींची उलाढाल
  • - दर्शनास येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचा असतो दोन दिवस मुक्काम
  • - एकूण दहा दिवस चालतो आषाढी सोहळा
  • - राज्यभरातून पंढरीत ३००-४०० पालख्यांचे होते आगमन
  • - मंदिरा शेजारी उभे राहतात शेकडो स्टॉल्स
  • - पंढरपूरात एक ते दोन महिन्यांपासून एकादशीची सुरू होते लगबग
  • - संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील वारकरी दर्शनासाठी उपस्थित
  • - पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लागतात २५-३० तास