esakal | पालखी सोहळ्यासाठी रस्ता चकाचक
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळ्यासाठी रस्ता चकाचक

पालखी सोहळ्यासाठी रस्ता चकाचक

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. २४) जिल्ह्यात लोणंद येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. तयारीची कामे वेगाने उरकण्याची लगबग सुरू आहे. 

शासनाच्या पालखी महामार्ग विभागाने नीरा-लोणंद पालखी मार्गाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करून हा रस्ता चकाचक केला आहे. या रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. खंडाळा व लोणंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यायी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झांडांच्या फांद्या तोडण्याचे काम केले जात आहे. नीरा ते लोणंद या सात किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गाचे पालखी महामार्ग विभागाकडून मुरूम टाकून रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. पर्यायी रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. पालखी तळावरील खड्डे बुजवून बुडजवण्यात येत आहेत. गुरुवारी (ता. २२) तळावर चिखल होवू नये म्हणून बारीक खडी (कच) टाकून तसेच जेथे वारकऱ्यांसाठी स्नानाची व तात्पुरत्या शौचालयाची युनिट बसवण्यात येणार आहेत, त्या परिसरात मोठी खडी टाकून तळाचे सपाटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती लोणंद शाखा अभियंता सूर्यकांत कुंभार यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने लोणंद नगरपंचायत व लोणंद पोलिसांच्या सहकार्याने काही दिवासांपूर्वी लोणंद शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला आहे. अतिक्रमण मोहिमेदरम्यान या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेला दगड मातीचा राडारोडा उचलण्याचे कामही बांधकाम विभाग करत आहेत. या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडून वाहतुकीला तसेच विजेच्या तारांना अडथळा होवू नये याची काळजी घेण्यात आली आहे.

दरम्यान, लोणंद शहराची गरज लक्षात घेवून येथे पालखी सोहळा आगमनादिवशी रुग्णवाहिका व शववाहिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपजिल्हाध्यक्ष विनोद क्षीरसागर, लोणंद शहर भाजपच्या वतीने उपाध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, नगरसेवक किरण पवार, सुभाषराव क्षीरसागर, नारायणराव साळुंखे, प्रजित परदेशी, अनिल कुदळे, ॲड. वैभव क्षीरसागर, ॲड. गणेश शेळके यांनी दिली.

तात्पुरत्या शौचालयांची एक हजार युनिट
शासनाच्या ‘निर्मल वारी व स्वच्छ वारी’ या योजनेंतर्गत वारी निर्मल व स्वच्छतेत तसेच आनंदाच्या वातावरणात पार पडवी, यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही माउलींच्या पालखी सोहळ्यासमवेत सर्व मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांच्या एक हजार युनिटची व्यवस्था केली आहे. त्या काळात स्वच्छतेचा संदेश व स्वच्छेतेबाबत जागृती करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, हिंदू एकदा दल व विविध ठिकाणाहून येणारे भाजपचे कार्यकर्ते सहभागी होऊन वारी निर्मल व स्वच्छ होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. गेल्या वर्षी ५०० स्वयंसेवक वारीत सहभागी झाले होते. या वर्षी ती संख्या दुपटीने वाढणार आहे.