#SaathChal आषाढीसाठी राज्यभरातून धावणार साडेतीन हजार बसगाड्या 

नरेश हळणोर
Monday, 9 July 2018

नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची तत्परताही महामंडळाने दाखवली आहे. 

नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची तत्परताही महामंडळाने दाखवली आहे. 

महसूलवृद्धी आणि खासगी वाहतुकीला आळा घालणे हे उद्देश महामंडळाच्या तयारीमागील आहेत. दरम्यान, राज्यभरातील पालखी, दिंड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. 23 जुलैच्या आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी रिंगण सोहळ्याची अनुभूति घेण्यासाठी भाविक मार्गस्थ होतात. अशा विठ्ठलभक्‍तांचा प्रवास अधिक सुखकर व सोइस्कर होण्यासाठी महामंडळाने आपल्या सहाही विभागातून बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या वारीनिमित्त नुकतीच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या उपस्थितीत भोसरीच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत बैठक झाली. बैठकीला राज्यातील विभाग नियंत्रकांसह वाहतूक नियंत्रण समितीचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

307 अधिकारी-कर्मचारी 
सहाय्यक वाहतूक अधिकारी, वाहक निरीक्षक, सहाय्यक वाहक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक असे 197 अधिकारी नियुक्त केले आहेत. त्याचप्रमाणे, ऐनवेळी बसेसला बिघाड होण्याची शक्‍यता गृहित धरून यांत्रिकी, विद्युत कर्मचाऱ्यांसह टायर फिटर, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी असे 110 कर्मचारीही औरंगाबाद, नाशिक, पुणे या विभागातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बसगाड्यांसाठी पुरेशा इंधनाचीही व्यवस्था केली असून तिकीटांसाठीचे इटीआय मशिन चार्जिंग, दुरुस्तीसाठीचे पुरेसे स्पेअरपार्ट, तिकीट रोल उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायमॅक्‍स कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत. 

विभागनिहाय बसगाड्यांची उपलब्धता 
विभाग बसगाड्यांची संख्या 
औरंगाबाद : 1 हजार 70 
ंमुंबई : 284 (अतिरिक्त 250 बसेस पुणे विभागास देणे आहे) 
नागपूर : 130 (अतिरिक्त 100 बसेस अमरावती विभागाला देणे आहे) 
पुणे : 1 हजार 7 
नाशिक : 750 
अमरावती : 540 

पंढरपूरमधील बसगाड्यांसाठी तळ 
0 भीमा यात्रा बसस्थानक (देगाव) : औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड, परभणी, जालना, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, सोलापूर, नागपूर, वर्धा आगारसाठी. 
0 विठ्ठल कारखाना : नाशिक, धुळे, जळगाव, नगर आगारसाठी. 
0 चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पंढरपूर आगारसाठी. 

वारकऱ्यांसाठीच्या सुविधा 
0 पंढरपूरकडे जाणे व परतीच्या प्रवासासाठीचे बसगाड्यांचे वेळापत्रक विभागासह आगारांच्या बसस्थानकावर लावणार. परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण व्यवस्थेसह संगणकीय आगाऊ आरक्षणही चंद्रभागा, विठ्ठल कारखाना, भीमा या यात्रा बसस्थानकांवर 24 तास उपलब्ध असणार. 
0 भाविकांच्या स्वागतासह सुरक्षिततेसाठी आगारात सतत उद्‌घोषातून सूचना दिल्या जातील. सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी एसटी बसनेच प्रवास करावा, खिसे कापूपासून सावधान, सामानाची काळजी घ्या, बेवारस सामानास हात न लावता माहिती द्या आदी स्वरुपाच्या घोषवाक्‍ये असतील. 
* पंढरपूरमधील तीनही बसस्थानकांवर टेलीफोन, झुणका भाकर स्टॉल, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था असणार आहे. याशिवाय आरोग्याची समस्या उद्‌भवल्यास तात्काळ सेवा मिळावी म्हणून रुग्णवाहिकाही सज्ज असतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ashadi bus