Wari 2019 : देहूनगरीची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

विविध सुविधा
जिल्हा हिवताप केंद्राकडून गावात औषध फवारणी करण्यात येत आहे. धूर फवारणीसाठी चार मशीन उपलब्ध आहेत. माळवाडी, विठ्ठलवाडी या गावांतही स्वच्छतेची कामे केली आहेत. पालखी मार्गावर माळवाडी येथे खड्डे बुजविण्यात येत आहेत. भाविकांच्या निवाऱ्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि भक्त निवासात सोय करण्यात आली आहे.

देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सोमवारी (ता. २४) आहे. या सोहळ्यातील भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी देहू ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. पालखी प्रस्थानच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी झटत आहे. देहूतील विविध ठिकाणी ३०० फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारीतील दिंडीकरांना ३५० आरोग्य कीटचे वाटप करण्यात येणार आहे. वारकऱ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे, यासाठी खास खबरदारी घेण्यात येत आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर म्हणाले, ‘‘विकास आराखड्यांतर्गत सरकारने विविध कामे केली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही.

पालखी सोहळ्यापूर्वी गावातील रस्ते चकाचक व्हावेत यासाठी ग्रामपंचायत प्रशासनही प्रयत्नशील आहे. स्वच्छतेसाठी २५ कर्मचारी तैनात केले आहेत. देऊळवाडा आणि इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. 

प्रस्थानाच्या दोन दिवस अगोदर दिंड्या, भाविक दाखल होतात. त्यांच्या आरोग्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गावातील विहीर, हातपंपाची दुरुस्ती सुरू आहे. पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता केली आहे. विकास आराखड्यांतर्गत ३०० स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. भाविकांना विना मोबदला स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच निर्मलवारीसाठी फिरते स्वच्छतागृह विविध नऊ ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Dehu Cleaning Aashadhi Wari Palkhi Sohala