यंदाची वारी निर्मल व आरोग्यदायी करा  - श्‍वेता सिंघल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 June 2017

फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील मुक्‍काम यंदा चार दिवसांचा राहणार आहे. या कालावधीत पंढरीची वारी निर्मल होण्याबरोबरच आरोग्यदायी होण्याच्या दृष्टीने संबंधित खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच वारीशी संबंधित सर्व खात्यांचा परस्पर समन्वय राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांनी व्यक्‍त केले. 

माउलींचा पालखी सोहळा ता. 24 ते 27 जून दरम्यान जिल्ह्यात मुक्‍कामी राहणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. 

फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील मुक्‍काम यंदा चार दिवसांचा राहणार आहे. या कालावधीत पंढरीची वारी निर्मल होण्याबरोबरच आरोग्यदायी होण्याच्या दृष्टीने संबंधित खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच वारीशी संबंधित सर्व खात्यांचा परस्पर समन्वय राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांनी व्यक्‍त केले. 

माउलींचा पालखी सोहळा ता. 24 ते 27 जून दरम्यान जिल्ह्यात मुक्‍कामी राहणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. 

यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, पंचायत समितीच्या सभापती रेश्‍मा भोसले, आळंदी देवस्थान पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. अजित कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्यासह तहसीलदार विजय पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पालखी मुक्‍काम आणि विसावा ठिकाणचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. 

पालखी मुक्‍कामाबरोबर मार्गावर प्रत्येक खात्याचा अधिकारी व त्याची टीम बरोबर असणे गरजेचे आहे. पालखी मुक्‍काम तळावरही अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून कार्यरत राहावे. पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच अन्य बाबींची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असून, वारीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी शुद्धच मिळाले पाहिजे. त्याची जबाबदारी मार्गावरील ग्रामपंचायती व फलटण पालिकेची आहे. सोहळा येथून पुढे गेल्यावरही संबंधित गावचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आरोग्य विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे. वर्षातून एकदा येणारी वारी निर्मल होण्याबरोबरच आरोग्यदायी व्हावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

प्रारंभी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी स्वागत करून विभागनिहाय प्रमुखांनी सद्य:स्थिती व वारी दरम्यान केलेल्या नियोजनाचा आढावा मांडला. 

पालखी सोहळ्यासाठी नियोजन 
मार्गावरील 328 नळ व विहिरी, 55 विंधन विहिरींच्या पाण्याची तपासणी होणार. 
टीसीएल टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांची 21 पथके नियुक्‍त. 
लोणंदपासून 49 वैद्यकीय अधिकारी, नऊ रुग्णवाहिका तैनात असतील. 
वारीबरोबर 20 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा आणि 21 ठिकाणी फिलिंग पॉइंट. 
दहा शासकीय फिरते दवाखाने वारीसोबत राहणार. 
मुक्‍कामाच्या कालावधीत विजेचे भारनियमन टाळण्यावर भर. 
नीरा उजव्या कालव्यात ता. 21 पासून पाणी सोडण्यात येणार. 
पाणीसाठा मर्यादित असल्याने सुरवातीला 330 क्‍युसेकने पाणी. 
पालखी तरडगावला येईपर्यंत कालव्यातील पाण्याची पातळी 800 क्‍युसेकपर्यंत जाणार. 
वारीच्या मार्गावरील बस पर्यायी मार्गावरून सोडण्यात येणार. 
फलटण शहरात चार ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची बस स्थानके उभारणार. 
पोलिस विभागामार्फत एक हजार पोलिस कर्मचारी, 61 अधिकाऱ्यांची नियुक्‍ती. 
मुक्‍कामस्थळी वॉच टॉवर उभारून सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार. 
अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्यपदार्थांची तपासणी होणार. 

लोणंद पालखी तळाचीही पाहणी 
लोणंद - संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात ता. 24 जूनला आगमन होत असून, लोणंद येथे यंदा त्याचा दीड दिवसाचा मुक्काम आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज लोणंद पालखीतळ, दिंड्या उतरण्याची ठिकाणे, नीरा नदीतील दत्तघाट, लोणंद नगरपंचायतीचे पाडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र, जिल्ह्याच्या सीमेवरील स्वागतस्थळ आदी ठिकाणांना भेट देवून पाहणी केली. 
दरम्यान, याप्रसंगी श्रीमती सिंघल यांनी नागरिक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, वाईचे प्रभारी प्रांताधिकारी अविनाश शिंदे, खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब बागवान, लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध पदाधिकारी, परिसरातील गावचे सरपंच उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari phaltan news shweta singhal