esakal | पालकत्व निभावताना... : सारं काही ऑनलाईन...
sakal

बोलून बातमी शोधा

Child

‘ओवी, आता खूप झालं हं...आण तो मोबाईल, तास झाला तुझ्या हातात आहे,’’ मेधाने ओरडतच ओवीकडून मोबाईल काढून घेतला. ओवीनेही नाखुषीने आईला मोबाईल दिला. कधीतरी कंटाळा आला म्हणून गेम खेळायला ओवी आईकडून मोबाईल खेळायला घेत होती. मोबाईल फार न वापरण्याबद्दल घरातून, शाळेतून सक्त ताकीद असल्याने मेधाही ओवीला मोबाईल देत नव्हती. मुळात तिला या आभासी जगात वावरायला आवडत नव्हते.

पालकत्व निभावताना... : सारं काही ऑनलाईन...

sakal_logo
By
आशिष तागडे

‘ओवी, आता खूप झालं हं...आण तो मोबाईल, तास झाला तुझ्या हातात आहे,’’ मेधाने ओरडतच ओवीकडून मोबाईल काढून घेतला. ओवीनेही नाखुषीने आईला मोबाईल दिला. कधीतरी कंटाळा आला म्हणून गेम खेळायला ओवी आईकडून मोबाईल खेळायला घेत होती. मोबाईल फार न वापरण्याबद्दल घरातून, शाळेतून सक्त ताकीद असल्याने मेधाही ओवीला मोबाईल देत नव्हती. मुळात तिला या आभासी जगात वावरायला आवडत नव्हते. त्याचे तोटे माहीत असल्याने असेल कदाचित, मात्र कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शाळा अचानकच बंद झाली आणि ओवीने मोबाईलचा ताबा केव्हा घेतला हे तिला आणि तिच्या आईलाही समजले नाही. ‘घराबाहेर पडायचं नाही तर काय करू, बोअर होतंय,’ हे वाक्य ठरलेलेच. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इतक्या लहान वयात या मुलांना बोअर होते, आश्चर्यच पण...  या प्रश्नाला मेधाकडे उत्तर नव्हते. सुरुवातीला गेम, नंतर यू-ट्यूबवर मुलांचे खेळ पाहता-पाहता ओवी त्यामध्ये गुंतून गेली. त्यानंतर मोबाईववरून व्हिडिओ कॉल करण्याचे ती शिकली. मग काय कधी मामाला, तर कधी आत्याला आणि तर कधी आजी-आजोबांना ती फोन करायची. त्यात रमणे आणि अट्टाहास सुरू झाला. सुरवातीला ५-१० मिनिटांचे बोलणे १५-२० मिनिटांवर जायला लागल्यावर त्यातील धोका मेधाच्या लक्षात आला. तिने विचार केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मोबाईलवरील चॅटचे ॲप एकदम काढून टाकले तर त्याची वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त होईल, या भीतीने मेधाने ओवीची समजूत काढली आणि ठराविक वेळ निश्चित करून मैत्रिणींशी बोलण्याची मुभा दिली. मेधाला याची पुरेपूर जाणीव होती की, येणारा काळ हा डिजिटल साक्षरतेचा असणार आहे. 

मुलांना मोबाईलपासून लांब ठेवणे अशक्य आहे. अटी घालून त्यांना मोबाईल देण्यापेक्षा त्यातील फायदे-तोटे सांगण्याची भूमिका आणि अन्य मैत्रिणींच्या पालकांना समजून सांगण्याची जबाबदारी मेधाने घेतली. आता हे व्यसनाकडे झुकेल की काय असे वाटत असताना मेधाला एक कल्पना सुचली. इष्टापत्ती म्हणतात ना ती हीच हे मनोमन जाणले. दररोज तिने ओवीला एक उपक्रम दिला आणि तो सोडवायला वेळ ठरवून दिला. अलार्म वाजणार याची मज्जा, मोबाईल वापरायला मुभा मग ओवी खुशच होणार ना! 

एकदा ओवीने आईकडे हट्ट केला आणि मुग्धाच्या आईला फोन करायला सांगितला आणि त्या दिवसापासून नवीनच खेळ सुरू झाला. ओवी आणि मुग्धाबरोबर अन्य दोन मैत्रिणीही या व्हिडिओ कॉलच्या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. सगळ्यांच्या आईने रोज एक उपक्रम देण्यास सुरुवात केली. त्यात कधी खेळ होते, कधी गणिती कोडी होती तर कधी चक्क शुद्धलेखन होते मनोरंजनातून शिक्षण सुरू झाले. त्याची सर्वांना मजा यायला लागली. मैत्रिणींचा चांगला ग्रुप तयार झाला. दररोज एक चढाओढ सुरू झाली.

बघताबघता ओवी डिजिटल साक्षर होऊ लागली. नुकतीच बातमी आली की, आता शाळा इ-लर्निंग होणार आहेत. चला, लॉकडाउनमधील आपल्या उपक्रमाचा दुहेरी फायदा झाला हे जाणून मेधा मनोमन सुखावली. एरवी मोबाईलपासून चार हात लांब राहायला सांगणाऱ्या आईमध्ये झालेल्या बदलामुळे ओवीही आश्चर्यचकीत झाली. अर्थात नंतर तिनेही आईच्या परवानगीनेच मोबाईलला हात लावला. प्रत्येक गोष्टींची वेळ यावी लागते आणि सुवर्णमध्य काढला की प्रश्न सुटतो, नाही का?

loading image