गुंतागुंती वाढवणारा आजार : पीसीओएस  

डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
Saturday, 26 September 2020

पीसीओएसचे नक्की कारण माहीत नसले, तरी लवकर निदान आणि उपचाराबरोबरच वजनाचे व्यवस्थापन केल्यास टाईप २ मधुमेह आणि हदयविकार यांसारख्या दीर्घकालीन गुंतागुंती टळू शकतात. 

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक संप्रेरक विकार (हार्मोनल डिसॉर्डर) असून रिप्रॉडक्टीव्ह वयातील महिलांमध्ये सामान्यत: आढळतो. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीचा कालावधी अनियमित किंवा जास्त काळ असू शकतो किंवा अँड्रोजन हार्मोन्सची पातळी जास्त प्रमाणात असू शकते. अंडाशयात फॉलिकल्स म्हणजे असंख्य लहान द्रव संचय विकसित होऊ शकतात आणि नियमितपणे बीजांडे निर्माण करण्यात अयशस्वी ठरू शकतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीसीओएसचे नक्की कारण माहीत नसले, तरी लवकर निदान आणि उपचाराबरोबरच वजनाचे व्यवस्थापन केल्यास टाईप २ मधुमेह आणि हदयविकार यांसारख्या दीर्घकालीन गुंतागुंती टळू शकतात. 

लक्षणे : 
पीसीओएसची लक्षणे बहुधा यौवन काळातील पहिल्या मासिक पाळीच्या वेळेस विकसित होतात. कधीकधी पीसीओएसची लक्षणे नंतर दिसू लागतात. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणावर वजन वाढल्यानंतर. खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. 

- अनियमित मासिक पाळी : अनियमित किंवा अधिक काळ असलेली मासिक पाळी पीसीओएसचे सर्वांत सामान्य लक्षण असते. 

- वाढलेली अँड्रोजनची पातळी : वाढलेल्या अँड्रोजनच्या पातळीमुळे शरीरावर आणि चेहऱ्यावर अतिरिक्त केस येणे, तीव्र स्वरूपातील मुरूम येणे, पुरूषांसारखे टक्कल पडणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- पॉलिसिस्टिक ओव्हरीज : अंडाशयाच्या आकारात वाढ होऊ शकते व अंड्यांच्या भोवती फॉलिकल्स म्हणजे द्रव साठू शकतात. परिणामी अंडाशयाच्या कार्यावर प्रभाव पडू शकतो. अशा प्रकारची कोणती लक्षणे असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पीसीओएसचे नेमके कारण अजून कळू शकलेले नाही. मात्र, स्वादुपिंडाद्वारे तयार होणारे इन्शुलिन अतिरिक्त प्रमाणात असेल, कमी प्रमाणात असलेल्या पांढऱ्या‍ रक्तपेशी, अनुवंशिकता आणि अँड्रोजनची अतिरिक्त पातळी हे जोखमीचे घटक ठरू शकतात. 

पीसीओएसमुळे अनेक गुंतागुंती होऊ शकतात- ज्यामध्ये वंध्यत्व, गरोदरपणातील मधुमेह व उच्च रक्तदाब, गर्भपात व अकाली जन्म, यकृतामध्ये चरबी साठल्याने होणारा दाह, मेटाबोलिक सिंड्रोम, टाईप २ मधुमेह, स्लीप अ‍ॅप्निया, नैराश्य, चिंता; खाण्याचे विकार, गर्भाशयाचा असामान्य रक्तस्त्राव, गर्भाशयाच्या आवरणावर कर्करोग (एंडोमेट्रियल कॅन्सर) यांचा समावेश आहे. लठ्ठपणामुळे गुंतागुंतीत अधिक भर पडू शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीसीओएसचे निदान करण्यासाठी ठराविक चाचणी जरी नसली, तरी तुमचे डॉक्टर, तुमचा वैद्यकीय इतिहास, मासिक पाळीबाबत माहिती, वजनात होणारे बदल अशी सर्व माहिती घेऊन सल्ला देणे सुरू करतील. त्याचबरोबर अतिरिक्त केस, मुरूम, इन्शुलिन रेझिस्टन्स याबाबत तपासण्या करतील. त्याचबरोबर अल्ट्रासाऊंड, रक्ताच्या चाचण्याबाबत सल्ला देऊ शकतील. पीसीओएसचे निदान झाल्यास काही अतिरिक्त चाचण्यादेखील सांगू शकतील. त्यामध्ये रक्तदाब, ग्लुकोज टॉलरन्स, कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसरीनची पातळी याबाबत नियमित तपासणी, नैराश्य व चिंता, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियाबाबत तपासणी यांचा समावेश आहे. 

पीसीओएसच्या उपचारांमध्ये वैयक्तिक गरजांनुसार सल्ला दिला जातो. त्याचबरोबर औषधोपचार आणि जीवनशैलीमधील बदलाबाबत सल्ला याचादेखील समावेश असू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Polycystic ovary syndrome