कलेचा समान धागा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

समीर आणि अक्षया यांच्यात अगदी मोजके बोलणे झाले होते; पण मग पुढे फोटोशूटच्या निमित्ताने हळूहळू दोघांमध्ये बोलणे होऊ लागले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 

(जोडी तुझी माझी : समीर परांजपे - अक्षया नाईक )
सध्या कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेतून अभिमन्यू (समीर परांजपे) आणि लतिका (अक्षया नाईक) ही जोडी लोकांसमोर आली आहे. समीर आणि अक्षयाची पहिली भेट झाली ती थेट ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या संहितावाचनासाठी. या भेटीत सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. सर्व नियमांचे पालन करून सर्व जण लांब लांब बसले होते. सर्वांनी मास्क लावल्यामुळे प्रत्यक्ष कोण कसे दिसते, हेच कळले नव्हते. समीर आणि अक्षया यांच्यात अगदी मोजके बोलणे झाले होते; पण मग पुढे फोटोशूटच्या निमित्ताने हळूहळू दोघांमध्ये बोलणे होऊ लागले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या भूमिकेबद्दल समीर सांगतो, ‘‘मुळात अभिमन्यूच्या भूमिकेसाठी मला फिटनेसवर लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे होते. लॉकडाऊनमध्ये जिम वगैरे बंद असल्यामुळे काही ट्रेनर्सबरोबर चर्चा करून या भूमिकेकरिता काय प्रकारची मेहनत घेतली पाहिजे, याचा अभ्यास केला. या काळात घरीच असल्याने आणि आंबे खाणे जास्त झाल्याने व्यायामावर जास्त मेहनत घ्यायची होती. तसेच नाशिकची भाषा, त्या भाषेचे उच्चारण या संदर्भात अभ्यास करावा लागला. जिथे शूटिंग चालते, त्या ठिकाणच्या लोकांशी मैत्री होत गेली आणि मग जो टोन उच्चारात असायला हवा, तो येऊ लागला.’’ 

अक्षया आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणते, ‘‘मी साकारत असलेली ‘लतिका’ ही खूप सात्त्विक स्वभावाची मुलगी आहे. तिच्या स्वभावात शांतपणा आणणे गरजेचे होते. मी मुळात खूप बडबड करत असल्याने आणि स्वतः एवढी शांत नसल्याने हा शांतपणा आणताना नक्कीच मेहनत घ्यावी लागली. मी मुंबईची असल्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत मी नाशिकच्या भाषेवर घेतली.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्षया ही खूप गुणी आणि मेहनती अभिनेत्री आहे, असे समीर म्हणतो. ती खूप दिलखुलास हसते, हा तिच्या स्वभावातील आवडणारा गुण आहे, असेही त्याने सांगितले. ‘समीर हा सर्वांना समजून घेणारा आहे. मितभाषी आहे, मिश्किल आहे. सेटवर सर्वांसाठी घरचा डबा आणतो. तो सहकलाकाराला सांभाळून घेणारा आहे,’ असे अक्षया सांगते. 

लॉकडाऊनच्या काळात समीरने शास्त्रीय संगीताच्या रियाजासाठी वेळ दिला, तर अक्षयाने या काळात ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या, तसेच आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला. दिलदार प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

(शब्दांकन : गणेश आचवल)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about sundara manamadhe bharali serial cast

Tags
टॉपिकस
Topic Tags: