पालकत्व निभावताना... : ऑनलाइन क्लास 

Online-Class
Online-Class

मानस भलताच खूष होता. कारण सुमारे तीन-चार महिन्यांनंतर त्याची शाळा सुरू होणार होती. अर्थात ऑनलाइन असली, तरी शाळा सुरू होत असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. गेल्यावर्षी पाचवीला त्याला आवडत्या शाळेत प्रवेश मिळाला होता. मल्लखांब हा त्याचा आवडता खेळ आणि शाळेतूनही त्याला त्यासाठी प्रोत्साहन मिळत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षीही मल्लखांबमध्ये चुणूक दाखवायची असे त्याने ठरविले होते. मात्र, शाळा आणि खेळ दोन्ही बंद असल्याने त्याचा हिरमोड झाला होता. ऑनलाइन का होईना शाळा कधी सुरू होते, याची त्याला उत्सुकता लागली होती. मानसला अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून आई-बाबांनी त्याला चांगलासा टॅबही घेऊन दिला होता. शाळेतून मानसच्या आईच्या म्हणजे अनघाच्या मोबाईलवर ऑनलाइन शाळेची लिंक आली होती आणि किती वाजता साईन व्हायचे याचे डिटेल्सही आले होते. 

अनघा फार तंत्रस्नेही नसली, तरी तिला या सर्वाची पुरेशी कल्पना होती. तिच्या नवऱ्याला ऑनलाइन मिटींग्जमध्ये कसे जॉईन व्हायचे याची माहिती होती. त्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वीच्या आदल्यादिवशी लिंक कशी कॉपी करून सुरूवात कशी करायची हे सांगितले. अनघाने सर्व समजून घेतले. दुसऱ्या दिवशी ऑनलाइन शाळा सुरू होण्यापूर्वीच अर्धातास आधीच मानस तयार होऊन बसला होता. अनघाला मात्र लिंक कॉपी होईल का आणि सारे काही व्यवस्थित होईल की नाही, याची काळजी होती. मानसला अगदी पहिल्या दिवशी शाळेत सोडताना जेवढी हूरहूर होती, त्यापेक्षा जास्त आता होती. कारण अशा पद्धतीने कधी शाळा सुरू होईल, याची तिने कल्पनाही केली नव्हती.

मानसच्या स्वभावाचा तिला अंदाज होता. त्याला मोबाईलचे वेड असले, तरी एका जागी तो किती वेळ स्थिर बसेल, याबद्दल तिच्या मनात धाकधूकच होती. मोबाईलपासून त्याने दूर व्हावे, यासाठी तिने खूप प्रयत्नही केले होते, त्याला काही प्रमाणात यश आले असले, तरी आता मोबाईलशिवाय पर्याय नसल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याला विरोध करण्यापेक्षा आपणच अधिक तंत्रस्नेही होत त्यातील प्लसपाइंट शोधण्याचा निश्चय तिने केला. मानसला आईमधील हा बदल लक्षात आला. ठरलेल्या वेळेनुसार ती लिंकवरून जॉइन झाली. तिच्या आधी सात-आठ पालक जॉईन झाले होते. आई अत्यंत सराईतपणे सर्व हाताळत असल्याचे मानसला कौतुक वाटले.

पहिल्या दिवशी केवळ औपचारिकता आणि नव्या तंत्राची ओळख करण्यात पार पडला. आई इतक्या कमी अवधीत सारे काही आत्मसात केल्याचे आश्चर्य मानसच्या चेहऱ्यावर दिवसभर होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com