वुमनहूड : बाकरवडी... पुणेरी!

Bakarwadi
Bakarwadi

हातातली बाकरवडी अस्सल पुणेरी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच! कारण ती कुठूनही ओळखता येते आणि या गोष्टीचा जरा माजच असतो आम्हा पुणेकरांना. तर ही अस्सल पुणेरी बाकरवडी आमच्या ‘आई कुठं काय करते,’ या सध्या गाजत असलेल्या सीरियलच्या दिग्दर्शक रवी करमरकर यांच्या हातात दिसत आहे. आता ती मुंबईत सेटवर रवी दादाच्या हातात कशी? ती एक गंमत आहे. 

आम्हा कलाकारांना दिग्दर्शकाचा शब्द पहिला आणि शेवटचा असतो. त्याचं सगळंच ठरलेलं असतं. हा सीन असा दिसेल, तू इथे उभी राहशील, तुझे वाक्य झाल्यावर तिची एन्ट्री होईल मग तू इमोशनल होशील, मग ती वाक्य बोलेल, मग तिच्यावर क्लोजअप आणि मग तुझ्यावर चार्ज. मग इथं सीन फ्रीज आणि मग कट टू डी-फ्रीज तुझ्या एन्ट्रीपासून.... 

आम्ही जेवढं स्क्रीनवर बोलतो त्याच्यापेक्षा जास्त तो आमच्या मागं बोलत असतो. कधी कलाकाराला त्या सीनची ग्रॅव्हिटी कळते, तर कधी तो काय बोलतो आहे, याचा गंधही लागत नाही. मग सगळं परत पहिल्यापासून त्याला समजावून सांगावं लागतं. शिवाय त्याला लाइट्स, सीनचा मूड, त्याचा ग्राफ, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम याकडंही लक्ष द्यावं लागतं. शिवाय दिग्दर्शकाला एखादा सीन, लेखकाशी चर्चा करून, चॅनलकडून परवानगी घेतल्यानंतर कलाकारांचा मूड, क्षमता, अभिनयाची जाण ओळखून तो त्यांच्याकडून काढून घ्यायचा असतो. एवढंच नाही, तर आम्ही कलाकार आमचे सीन संपवून घरी जातो, पण आमचा दिग्दर्शक शेवटच्या टेकपर्यंत...अंहं... पॅकअप म्हणेपर्यंत काम करत असतो. रवी दादाचं पण असंच असतं. मग त्याला ब्रेक हा लागणारच. मधल्या ब्रेकमध्ये त्याला चहा लागतो आणि तो मुळातच खवय्या आहे. रीतसर साजूक तूप लावून त्याचा डबा तो घरून आणतो. भारी मजा असते सेटवर.

‘होणार सून मी या घरची’च्या सेटनंतर आम्ही तीन वर्षांनी परत काम करतो आहोत. ‘होणार सून’च्या सेटवरच्या खूप आठवणी आहेत. आता परत मजा येत आहे. त्यात ही बाकरवडी जर जादू करत असेल, तर माझ्यासारख्या ‘Director''s Actor’चं काम सोपं होतं ना...!

आमच्या करता त्याचं समाधान सर्वांत महत्त्वाचं असतं. पुणे-मुंबई-पुणे अशी माझी long drive सारखी सुरू असते. हे रवी दादाला माहिती आहे. तर तो सरळ म्हणू शकला असता की, माझ्याकरता बाकरवडी घेऊन ये म्हणून. पण नाही. ‘काय गं, तुमच्या पुण्यात ती बाकरवडी चांगली मिळते म्हणे?’ आम्हा पुणेकरांना गर्भित अर्थ लगेच कळतात. पुण्याचा आणि पुण्याच्या पदार्थांचा जाज्वल्य अभिमान असलेली पुणेकर निघाली कार घेऊन आणि बाकरवडीची दोन पाकिटं घेऊनच परतली. एक संपूर्ण टीमसाठी आणि एक खास आमच्या दिग्दर्शकासाठी. 

वाटून झालेल्या बाकरवड्या तुम्हाला फोटोत दिसत आहेत. आता ही बाकरवडी कोणाकडची असेल, हे तुम्हाला समजले असेलच. इथे फुकटची जाहिरात कशाला... तुम्ही हुशार आहातच! एकूण काय ‘एक पुणेरी बाकरवडी की कीमत अब तुम जान गए होंगे रवी बाबू?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com