डेली सोप : सौंदर्य म्हणजे गोरेपणा नव्हे...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

‘त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे गं..’ किंवा ‘सावळाच रंग तुझा..’ ही माणिक वर्मा यांनी गायलेली गाणी आजही ऐकायला तितकीच गोड आणि अवीट वाटतात. या गाण्यांमधून सावळ्या रंगाची प्रतिभा अगदी योग्य शब्दात वर्णन केली आहे. साहित्यात दिमाखाने झळकलेला हा सावळा रंग खऱ्या आयुष्यात नाकारला गेला; किंबहुना आजही नाकारला जातोय. सुंदर दिसणं ही प्रत्येकाची स्वाभाविक भावना आहे, पण सौंदर्याचा संबंध थेट गोरेपणाशी जोडला जातो.

‘त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे गं..’ किंवा ‘सावळाच रंग तुझा..’ ही माणिक वर्मा यांनी गायलेली गाणी आजही ऐकायला तितकीच गोड आणि अवीट वाटतात. या गाण्यांमधून सावळ्या रंगाची प्रतिभा अगदी योग्य शब्दात वर्णन केली आहे. साहित्यात दिमाखाने झळकलेला हा सावळा रंग खऱ्या आयुष्यात नाकारला गेला; किंबहुना आजही नाकारला जातोय. सुंदर दिसणं ही प्रत्येकाची स्वाभाविक भावना आहे, पण सौंदर्याचा संबंध थेट गोरेपणाशी जोडला जातो. याच भावनेतून जन्माला येणारं मूल गोरंच हवं इथपासून लग्नविषयक जाहिरातींमध्येही ‘गोरी बायको हवी’ असं ठामपणे सांगितलं जातं. पण, सौंदर्यात आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, याचा विचार करायला भाग पाडणारी मालिका म्हणजेच स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मालिकेतील रंगानं सावळी असलेली दीपा, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा कार्तिक आणि सावळ्या रंगाचा द्वेष असणारी सौंदर्या इनामदार अशी सर्वच पात्रं प्रेक्षकांना आवडू लागली आहेत. सौंदर्याला काळ्या रंगाचा तिटकारा आहे. याच द्वेषातून तिनं स्वत:च्या मुलीला काळ्या व्यक्तीशी लग्न केलं म्हणून आपल्या आयुष्यातून दूर केलं. आता तिचा सर्वांत लाडका मुलगा कार्तिकही सावळ्या रंगाच्या दीपाच्या प्रेमात पडलाय. इतकंच काय, तर सौंदर्याच्या विरोधात जाऊन दीपाशी तो लग्नही करणार आहे.

अहंकार दुखावलेली सौंदर्या दीपाला सून म्हणून स्वीकारेल का, याची रंजकदार कहाणी मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. खरंतर मालिकांमुळं समाजमन बदलतं की समाजाचं प्रतिबिंब मालिकांमध्ये दिसतं, हे तसं न सुटणारं कोडं. मात्र, आजूबाजूला नजर टाकल्यास आजही सावळ्या रंगाच्या मुलीचं प्रत्येकालाच वावडं असतं. अभिनेत्री रेश्‍मा शिंदेनं दीपाच्या मनाची घालमेल व हर्षदा खानविलकर यांनी सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा सुंदर साकारली आहे. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rang majha vegla