जोडी पडद्यावरची : या सुखाच्या सरी

Shashank-and-Mrunal
Shashank-and-Mrunal

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या कलर्स मराठीवरील मालिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. त्यातील अनु आणि सिद्धार्थ ही जोडी विशेष लोकप्रिय झाली. अनुची भूमिका मृणाल दुसानीस, तर सिद्धार्थची शशांक केतकर करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मृणाल आणि शशांक यांचा खऱ्या अर्थानं परिचय झाला तो याच मालिकेच्या निमित्तानं. शशांक म्हणतो, ‘या मालिकेत मृणाल दुसानीसबरोबर भूमिका करायची आहे, हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. तिच्या या आधीच्या भूमिका मी पाहिल्या होत्या. तिच्या भूमिकांचे अनेक चाहते आहेत. त्यामुळं ‘सिद्धार्थ’ साकारताना मृणालबरोबर भूमिका करता येणार, यासाठी मी खूप उत्सुक होतो.’ 

मृणाल म्हणते, ‘शशांकचे देखील खूप चाहते आहेत. आमच्या मालिकेतील ‘अनु’ आणि ‘सिद्धार्थ’ या जोडीला खूप लोकप्रियता मिळाली. प्रेक्षकांना या व्यक्तिरेखा इतक्या आवडू लागल्या होत्या की, त्यांनी ‘अनु फॅन क्लब’, ‘सिद्धार्थ फॅन क्लब’, ‘अनु-सिद्धार्थ फॅन क्लब’ असे ग्रुप सोशल मीडियावर तयार केले होते.’ ‘मृणाल खूप शांत स्वभावाची आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे,’ असे शशांक सांगतो. तिच्या आवडलेल्या भूमिकांविषयी शशांक म्हणतो, ‘मला मृणालचं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’मधील काम आवडलं होतं. मुख्य म्हणजे त्या मालिकेनं कॉलेजमधील तरुण वर्गाच्या मनात उत्तम स्थान मिळवलं होतं.’ शशांकची ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ची भूमिका आवडल्याचं मृणालनं सांगितलं. ‘शशांक सहसा पटकन चिडत नाही, त्याच्यात खूप पेशन्स आहेत,’ असंही ती म्हणाली. 

लॉकडाउनच्या काळात शशांकनं त्याच्या स्वतःच्या ‘इंडिड कॅन्डीड’ या यू-ट्यूब चॅनलवर लक्ष केंद्रित केलं. तसंच, कॅरम खेळणं, पत्त्यातील नवीन खेळ शिकणं यातही त्यानं वेळ घालवला. मुख्य म्हणजे वेब सिरीज आणि चित्रपटांसाठी शशांकनं या काळात कथा लिहिल्या आहेत. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी मृणाल मुंबईहून नाशिकला तिच्या माहेरी गेली होती. काही दिवस ती नाशिकला होती, तर काही दिवस सासरी पुण्यात होती. या काळात नवीन खाद्यपदार्थ करणं, चांगली पुस्तकं वाचणं यात तिनं वेळ घालवला. लॉकडाउनचा ताण घ्यायचा नाही, सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याकडं बघायचं, असं मृणालनं ठरवलं. 

चाहत्यांच्या संदर्भातील एक चांगली आठवण दोघांनीही सांगितली. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ सुरू झाल्यापासून अनेक अभिप्राय येत होते. एका कुटुंबातील आईचा आपल्या मुलाच्या लग्नाला विरोध होता आणि ती आपल्या मुलाशी काही महिने बोलत नव्हती. आमची मालिका आणि ‘अनु-सिद्धार्थ’ या जोडीला पाहून त्या आईचा विरोध मावळला. आपल्या मुलांचं सुख जास्त महत्त्वाचं आहे, असं समजून घेऊन ती आई तिच्या मुलाशी बोलू लागली. या आठवणीवरून आपल्याला मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. 
(शब्दांकन - गणेश आचवल) 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com