ऑन डिफरंट ट्रॅक : आत्मनिर्भर

Self-reliant
Self-reliant

महिलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रांत जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अशाच काही आत्मनिर्भर महिला मला भेटल्या. लेखिका या नात्याने त्यांचे कार्य, प्रवास तुमच्यापर्यंत पोचवत असताना त्यांच्याकडून मी खूप शिकले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केतकी घाटे व मानसी करंदीकर, निसर्गाचे संवर्धन व पुनरुज्जीवन या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या दोघी आपणही दैनंदिन व्यवहारांत थोडेफार बदल करून निसर्गाच्या संवर्धनात कसा हातभार लावू शकतो, हे सांगतात. सोनाली फडके व धारा कबारिया या दोघी अ‍वलियांची ‘कवडीमोल’ कचऱ्यावर ‘अप-सायकलिंग’ नावाची जादूची कांडी फिरल्यावर कचराही ‘मौल्यवान’ वाटू लागतो, हे नक्की.

महिलांमध्ये निसर्गतःच नेतृत्वगुण व सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची क्षमता असते. आपल्यातील ही क्षमता अपर्णा चव्हाण व मधुरा पेठेने अगदी अचूक ओळखली. अपर्णाने सुमारे एक हजार स्थानिक कारागिरांना सोबत घेऊन कलेतून स्वयंरोजगार व आत्मनिर्भरता मिळवता येते. याचा उत्तम पाठ घालून दिला आहे. तर मधुराने फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच जगभरातील जवळपास तीन लाख खवय्यांना एकत्रित आणले आहे.

महिलांचे क्षेत्र ‘चूल आणि मूल’पर्यंतच सीमित असते अशा समाजातून आलेली सादिया खान आणि मुलींनी आत्मनिर्भर असलेच पाहिजे असा आग्रह असणारी मृणाल कांबळे व तिचे वडील. या दोघी अगदी भिन्न वातावरणातील. समाजाची बुरसटलेली चौकट मोडून सादियाने फूड ब्लॉगिंग, मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. तर ‘पिच्यांक सिलॅट’ या खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग पाच वेळा सुवर्णपदक जिंकून मृणालने सर्वांसमोर ‘छोरीयाँ किसी से कम नहीं,’ हा वस्तुपाठ घालून दिला.

रुळलेली वाट तर आपल्या मैत्रिणींनी कधीच सोडली. प्रियांका जोशीने ‘व्हाईसओव्हर’ या तिच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी चांगल्या पदाची आणि पगाराची नोकरी सोडली. आणि साईली दातारने इतिहास संशोधनासारखे आव्हानात्मक क्षेत्र निवडले. अत्यंत आत्मविश्वासाने या दोघीही त्यांच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. मनात इच्छा व जिद्द असेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर सहजतेने मात करता येते, मग ती समस्या ‘लॉकडाउन’ची असो किंवा दुर्गम परिसराची. ‘लॉकडाऊन’च्या काळात अपूर्वा आपटे हिने ‘संगीतातील गंमत’ हा उपक्रम सुरू केला आणि बघता-बघता तो लोकप्रियही झाला. उज्वला बोगामी न डगमगता आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी अविरत झटत आहे.

‘एज इज जस्ट अ नंबर,’ हे केवळ म्हणण्यासाठी नाही. कोणत्याही वयात करिअरला सुरुवात करता येते हे दाखवून दिले आहे, मृदुला केळकर, मीनल कुलकर्णी व सीमा दाबके यांनी. वयाच्या साठाव्या वर्षीही मृदालाताई ‘पपेट शोज’मधून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनात व्यग्र आहेत. मीनलताईंनी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी ज्योतिष क्षेत्रात करिअरला सुरुवात केली आणि आज पासष्टाव्या वर्षीही कार्यरत आहेत. सीमाताईंनीदेखील निवृत्तीनंतर दिव्यांगांच्या कार्याला वाहून घेतले आहे. आपल्या क्रिएटव्हिटीने लीना सौमित्र आणि अश्विनी भावसार-शाह या दोघींनी एक वेगळी वाट चोखंदळली आहे. ‘मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क आणि प्रेझेन्टेशनच्या जोरावर व्यवसाय यशस्वी करता येतो हा मंत्र अश्विनीने दिला, तर दगडांनाही भावना असतात हे जाणवल्यावर लीना ‘पेबल आर्ट’च्या माध्यमातून दगडांना बोलते करते. आणि एक युवाशक्ती शीतल शेखे समाजासाठी, भावी पिढीसाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवीत आहे.

ही लेखमाला काही काळासाठी निरोप घेत आहे. या साऱ्याजणींविषयी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत. मात्र, या साऱ्याजणींनी आपल्याला प्रेरणा दिली व पुढेही त्या सर्वांना प्रेरित करत राहतील याची खात्री आहे. या सर्वांना पुन्हा एकदा सलाम! 
धन्यवाद...
(समाप्त)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com