आरोग्यसखी : हृदयविकार आणि व्यायाम

हृदयविकार आणि व्यायामाविषयी आपल्या मनात खूप समज आणि गैरसमज आहेत.
Heart
HeartSakal
Summary

हृदयविकार आणि व्यायामाविषयी आपल्या मनात खूप समज आणि गैरसमज आहेत.

हृदयविकार आणि व्यायामाविषयी आपल्या मनात खूप समज आणि गैरसमज आहेत. हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी व्यायाम करू नये, त्याने परत हार्ट ॲटॅक येऊ शकतो इत्यादी. या लेखामध्ये आपण व्यायाम करावा, की करू नये आणि केल्यास कसा करावा हे पाहुयात.

व्यायाम हृदयविकारास उपयुक्त आहे का हानिकारक?

व्यायाम हा हृदयविकारास अत्यंत उपयुक्त आहे. नियमित व्यायामामुळे रक्तदाब कमी होतो. एलडीएल (‘खराब’) कोलेस्टेरॉल कमी होते. हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि हृदयाची पंपिंग क्षमता वाढते. वजन कमी झाल्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत करतो. आपल्या शरीरात हॉर्मोनचे योग्य संतुलन साधले जाते आणि कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील प्लाक वाढण्यास प्रतिबंध होतो.

व्यायाम कसा करावा?

आपल्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेऊनच व्यायामास सुरुवात करावी. व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला सखोल तपासण्या, २ डी इको, कार्डिओग्राफी आणि एक्सरसाइज टेस्ट कराव्या लागतील. अनियंत्रितरित्या व्यायाम केल्यास हृदयास हानी पोचू शकते. दोन प्रकारचे व्यायाम आपण करू शकता :

१. कार्डिओ अथवा एरोबिक व्यायाम : यामध्ये ट्रेडमिल, सायकल, चालणे, पळणे, पोहणे इत्यादींचा समावेश होतो.

२. स्ट्रेंथ ट्रैनिंग : यामध्ये वजने उचलून व स्नायूंना ताण देऊन व्यायाम केले जातात.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे, हृदयविकार असलेल्या व्यक्तीने प्रत्येक आठवड्याला १५० मिनिट एवढा मध्यम तीव्रतेचा अथवा ७५ मिनिटे जास्त तीव्रतेचा व्यायाम करणे आवश्यक आहे.

हृदयविकार असलेल्यांनी योगासने करावी का?

नियमित योगासने केल्यामुळे हृदयावरील ताण, रक्तदाब आणि पर्यायाने हृदयआरोग्य सुधारण्यास मदत होते. प्राणायाम म्हणजेच श्वसनाचे व्यायाम हे आपल्या मेंदूचे हृदयावरील नियंत्रण वाढविण्यास मदत करतात. प्राणायामामुळे हृदयाची इस्केमिया सहन करण्याची क्षमता वाढते, यालाच ‘ईशकेमिक मायोकार्डियल प्रेकंडीशनिंग’ असे म्हणतात. यामुळे आपल्याला परत हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी होते, हे विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत शोधनिबंधांद्वारे सिद्ध झाले आहे. यामध्ये खूप गुंतागुंतीची आसने सुरवातीला टाळावीत.

आपण सुरक्षित राहून कसा व्यायाम करावा?

टार्गेट हार्ट रेट : प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाची एक कमाल गती असते, की ज्याच्यापुढे व्यायाम केल्यास हृदयास हानी पोचू शकते. आपण व्यायाम करताना ही गती ध्यानात ठेवून तिच्यापलीकडे जाऊ नये. साधारणपणे ही गती ‘२२० - वय’ अशी मोजली जाते. या गतीच्या साधारणपणे ६० ते ८० टक्क्यांपर्यंत हार्टरेट जाईल इतका व्यायाम करावा. हा व्यायाम करताना सुरुवातीचे काही महिने हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि ईसीजी मॉनिटरिंगखाली करावेत म्हणजे काही अपाय होत असल्यास तो त्वरेने निदर्शनास येतो.

व्यायामाच्या दरम्यान काही त्रास होऊ शकतो का?

व्यायाम करताना छातीत दुखणे, घाम येणे, छाती भरून येणे, अस्वस्थता वाटणे व चक्कर येणे असे वाटल्यास लगेच आपल्या डॉक्टरशी संपर्क साधावा आणि व्यायाम त्वरित थांबवावा. यामुळे पहिले काही महिने हा व्यायाम देखरेखीखाली करावा. व्यायामामध्ये व नंतर भरपूर पाण्याचे सेवन करावे.

अशा रीतीने आपण क्रमवार आपला व्यायाम वाढवत नेल्यास आपल्या हृदयाला बळकटी येते व हृदयविकाराचे रिस्क फॅक्टर्स कमी होण्यास व पर्यायाने हृदयविकार रिव्हर्स होण्यास मदत होते. सरतेशेवटी, व्यायामास व्यसनमुक्ती आणि पोषक आरोग्यदायी आहाराची जोड असावी.

(लेखक हृदयरोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com