
गणेश यांना श्वास घेताना खूप दम लागत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यापूर्वी त्यांना दोनदा हार्ट अटॅक येऊन गेला होता. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले, की त्यांना हार्ट फेल्युअर झाले आहे.
गणेश यांना श्वास घेताना खूप दम लागत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यापूर्वी त्यांना दोनदा हार्ट अटॅक येऊन गेला होता. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले, की त्यांना हार्ट फेल्युअर झाले आहे. ते ऐकल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना वाटले, की त्यांचे हृदय बंद पडले आहे; पण परिस्थिती वेगळी होती. त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट करून व्हेंटिलेटर इत्यादी उपचार करून घरी आणण्यात आले; पण हार्ट फेल्युअर म्हणजे नक्की काय हे त्यांना समजले नव्हते.
हार्ट फेल्युअर हा शब्द ऐकला, की आपल्याला वाटते, की हृदय बंद पडणे. मात्र, याचा अर्थ आहे : ‘हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे.’ हृदयाचे काम म्हणजे शुद्ध रक्त हे शरीराला त्याच्या मागणी आणि गरजेनुसार पंप करून पुरवणे. हा शरीराचा पंप आईच्या पोटात असल्यापासून मृत्यूपर्यंत अविरतपणे चालू असतो. काही कारणास्तव त्याची पंपिंग क्षमता कमी झाल्यास, जेवढ्या रक्ताची गरज आहे तेवढे रक्त हृदय पंपिंग करू शकत नाही. थोडक्यात हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट ॲटॅक अथवा हृदय बंद पडणे (कार्डियाक अरेस्ट) नाही. साधारणपणे ६० वर्षाच्या वरील १० टक्के लोकसंख्येला हार्ट फेल्युअरचा त्रास होतो. हे आकडे हृदयविकारापेक्षा जास्त आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट फेल्युअरचे प्रमाण जगभर वाढले आहे. वेळेवर याचे निदान आणि उपचार केल्यास आरोग्य नीट राहण्यास मदत होते. हार्ट फेल्युअर हा हृदयविकाराचा एक परिणाम आहे, की जो आपल्याला हृदयविकारानंतर काही कालावधीने होऊ लागतो.
हार्ट फेल्युअरमध्ये नक्की काय होते?
हृदयाची पंपिंग कमी झाल्यामुळे रक्त हृदयात साचून राहते. याचे पर्यवसान हृदयाचा आकार मोठे होण्यात होते. त्यामुळे फुफ्फुसामध्ये पाणी साचले जाते- ज्याला आम्ही ‘पल्मोनरी ईडीमा’ म्हणतो. यामुळे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया अवघड होते व दम लागण्यास सुरुवात होते. हळूहळू पाणी साचण्यानी प्रक्रिया ही पाय आणि इतर शरीरातही होते, तेव्हा शरीररवर आणि पायावर सूज येते आणि दम लागणे अजून वाढते. शरीराला पर्यायाने गरजेएवढे रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा होत नाही. वेळेवर उपचार केले गेले नाहीत, तर हृदयक्षमता कमीकमी होत जाते व अंतिमतः मृत्यू संभवतो. यामुळे हार्ट फेल्युअरवर उपचार त्वरित करणे आवश्यक ठरते आणि औषधे, जीवनशैली बदल इत्यादी करून त्याचा पुढील धोका कमी करता येतो.
हार्ट फेल्युअर कशामुळे?
हार्ट फेल्युअरची दोन महत्त्वाची करणे आहेत -
१. कोरोनरी आर्टरी डिसीज (हृदयविकार) - हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाचा काही भाग हा निकामी होतो आणि ह्रिदयाची पंपिंग क्षमता कमी होते व याचे पर्यवसान हे हार्ट फेल्यूर मध्ये होते.
२. उच्चरक्तदाब (ब्लड प्रेशर) - हृदयायला सातत्याने उच्च रक्तदाबाच्या विरुद्ध पंप करावे लागल्याने हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते. याव्यतिरिक्त मधुमेह, थायरॉईड, प्रसुतीपश्चात आणि काही औषधे व उपचारांनंतरसुद्धा हार्ट फेल्युअर होऊ शकते. स्थूलता, धूम्रपान, कोलेस्टेरॉल जास्त असणे, स्लीप ॲप्निया, हृदयाच्या आतमध्ये काही छिद्रे असणे इत्यादींमुळेसुद्धा हार्ट फेल्युरची शक्यता वाढते.
हार्ट फेल्युअरची लक्षणे
चालताना अथवा बसल्यावरदेखील श्वास घेण्यास त्रास होणे आणी दम लागणे. खूप थकवा येणे आणि गळून गेल्यासारखे वाटणे. झोपायला आडवे झाले, की दम लागणे अथवा खोकला येणे, व्यायाम अथवा श्रम झाल्यास दम लागणे किंवा खोकला येणे. पायावर सूज येणे. अचानक वजन वाढणे आणि दम लागणे. डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येणे किंवा क्षणिक शुद्ध हरपणे.
हार्ट फेल्युअरचे निदान
शारीरिक तपासणी आणि लक्षणे, ईसीजी यामुळे हार्ट फेल्युअरचे निदान होण्यास मदत होते.
२ डी इको : म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. यामध्ये हृदयाची पंपिंग क्षमता (इजेक्शन फ्रॅक्शन- ईएफ) मोजली जाते. नॉर्मल व्यक्तीचा ईएफ ५५ टक्के किंवा जास्त असतो. तो कमी होत म्हणजे ४० टक्के अथवा कमी होतो, तेव्हा हार्ट फेल्युअरचे निदान होऊ शकते. इजेक्शन फ्रॅक्शन ४० टक्के आहे, म्हणजे हृदय ४० टक्के क्षमतेने चालू आहे आणि ६० टक्के कमी झाले आहे असे नाही. याचा अर्थ असा, की हृदयक्षमता ५५ टक्क्यांवरून ४० टक्के झाली आहे. याव्यतिरिक्त २ डी इकोमधून हृदयाचे व्हॉल्व्ह्ज/ झडप इत्यादींचीही माहिती मिळते.
छातीचा एक्सरेसुद्धा फुप्फुसातील पाण्याबद्दल माहिती देऊ शकतो. या व्यतिरिक्त NT ProBNP नावाची रक्त तपासणी अतिशय उपयुक्त आहे. हे एक द्रव्य आहे, की ज्याची मात्रा हार्ट फेल्युअरमध्ये रक्तामध्ये वाढते व हार्ट फेल्युअरचे अचूक निदान केले जाते. या तपासणीद्वारे निदान आणि रुग्णाची प्रगती यावरदेखील लक्ष ठेवता येते .
यापुढील भागामध्ये आपण हार्ट फेल्युअरवरील उपचार आणि जीवनशैलीतील उपयुक्त बदल यांविषयी माहिती घेऊ.