आरोग्यसखी : उच्च रक्तदाबाचा अदृश्य धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Blood Pressure
आरोग्यसखी : उच्च रक्तदाबाचा अदृश्य धोका

आरोग्यसखी : उच्च रक्तदाबाचा अदृश्य धोका

जागतिक उच्च रक्तदाब दिन १७ मे रोजी साजरा केला जातो. ‘उच्च रक्तदाब व्यवस्थित मोजणे आणि निदान करणे,’ हे या वर्षीचे ब्रीदवाक्य आहे.

आपल्या रक्तवाहिन्यांच्याद्वारे जो दबाव त्या वाहिन्यांच्या भिंतींवर दिला जातो, त्याला ‘रक्तदाब’ असे म्हणतात. उच्च रक्तदाब ही संकल्पना कार टायरमध्ये हवेच्या दाबाच्या संकल्पनेसारखीच आहे. ज्या वेळी हा रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब (हायपरटेंशन) असे म्हणतात. रक्तदाब हा दिवसात स्थिर नसतो, तो कमी आणि जास्त होत राहतो, परंतु तो बराच काळ तो उच्च राहिल्यास आरोग्यास त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाब हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवते, जी आपल्या देशातील मृत्यूची प्रमुख कारणे आहेत.

रक्तदाबाचे आकडे काय दर्शवितात?

दोन अंकांचा वापर करून रक्तदाब मोजला जातो. आपले हृदय आकुंचन पावते, तेव्हा जो रक्तदाब असतो त्याला ‘सिस्टोलिक रक्तदाब’ म्हणतात. हा mmHg म्हणजे ‘मिलिमीटर्स ऑफ मर्क्युरी’मध्ये मोजला जातो. आपले हृदय दोन ठोक्यांमध्ये थोडी विश्रांती घेते, तेव्हा ‘खालचा रक्तदाब’ किंवा ‘डायस्टोलिक रक्तदाब’ निर्माण होतो. जेव्हा आपण ‘१२०/८०’ असे रक्तदाब असा वाचतो, तेव्हा १२० हा सिस्टोलिक आणि ८० हा डायस्टोलिक रक्तदाब असते.

सरासरी सामान्य रक्तदाब हा १२०/८० mmHg पेक्षा कमी असतो. सिस्टोलिक रक्तदाब १३० आणि डायस्टोलीक रक्तदाब ८० पेक्षा जास्त असतो, तेव्हा उच्च रक्तदाबाचे निदान केले जाते. फक्त एकदा रक्तदाब जास्त आल्यास त्यावरून उच्च रक्तदाबाचे निदान केले जाऊ नये. डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेरील आणि स्वतः घरी मोजलेल्या रक्तदाबाला प्राधान्य दिले जाते. घरी आपण तणावमुक्त असताना रक्तदाब मोजता, तेव्हा तो बरोबर मोजला जातो. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये मोजलेला रक्तदाब हा थोड्या प्रमाणात जास्त मोजला जातो हे लक्षात ठेवावे.

जर एकदाच आपले रक्तदाब रीडिंग जास्त आल्यास घाबरण्याचे काही कारण नाही. जर हा रक्तदाब थोड्याच प्रमाणात जास्त असेल, तर १० मिनिटे विश्रांती घेऊन आपला रक्तदाब परत काही वेळा तपासावा. बहुतांशी वेळा तो कमी झालेला आढळेल. ह्यानंतर आपल्या डॉक्टरांना दाखवून त्याची खात्री करून घ्यावी. जर रक्तदाब १८०/१२० च्या वर दर्शवित असेल, तर त्वरेने आपल्या डॉक्टरांना दाखवावे. छातीत दुखणे, दम लागणे, चक्कर येणे, उलटी होणे अथवा डोके दुखणे अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित क्लिनिक अथवा रुग्णालयामध्ये दाखवावे. ही इमर्जन्सी असू शकते.

उच्च रक्तदाबाविषयी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. यामुळे या रोगाला कधीकधी ‘सायलेंट किलर’ असे म्हणतात. अनेकांना हे माहीत नसते, की त्यांना उच्च रक्तदाब आहे. म्हणूनच रक्तदाब नियमितपणे तपासणे महत्वाचे आहे. क्वचितच, उच्च रक्तदाब डोकेदुखी किंवा उलट्यासारख्या लक्षणांना कारणीभूत ठरू शकतो. आपला रक्तदाब डॉक्टरांकडून तपासून घेतल्यावरच आपल्याला उच्च रक्तदाब आहे का नाही ते समजते. आपला रक्तदाब मोजणे हे अतिशय सोपे आणि वेदनारहित आहे. किंबहुना ज्यावेळी उच्च रक्तदाबाची लक्षणे चालू होतात, त्यावेळी त्याची गुंतागुंत अथवा कॉम्प्लिकेशन्स चालू झालेली असतात. यामुळे आपण उच्च रक्तदाबाची नियमीतपणे तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम

उच्च रक्तदाब आपल्या आरोग्यास बऱ्याच प्रकारे नुकसान करू शकतो. तो आपले हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांसारख्या महत्त्वपूर्ण अवयवांना गंभीरपणे इजा करू शकतो. उच्च रक्तदाब आपल्या रक्तवाहिन्यांना कडक करू शकतो, ज्यामुळे आपल्या हृदयात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि हृदयाचा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. त्यामुळे छातीत दुखणे (अंजायना), हार्ट फेल्युअर, हार्ट ॲटॅक इत्यादी होऊ शकतात.

मेंदू : उच्च रक्तदाब मेंदूला रक्त आणि ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव किंवा ब्लॉक करू शकतो, ज्यामुळे स्ट्रोक (पक्षाघात) होऊ शकतो. मेंदूच्या पेशीना रक्तपुरवठा न झाल्यामुळे त्या मृत होतात, यालाच आपण ‘स्ट्रोक’ असे म्हणतो. स्ट्रोकमुळे संभाषण, हालचाल आणि इतर मूलभूत क्रियांमध्ये गंभीर अपंगत्व येऊ शकते.

मूत्रपिंड : ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दोन्ही असतात, त्यांना मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची खूप शक्यता असते. यालाच ‘सीआरएफ’ असे म्हणतात- ज्याच्यामध्ये आपल्या मूत्रपिंडाची क्षमता कमी कमी होत जाऊ शकते व त्याचे पर्यवसान हे डायलिसिसची गरज पडण्यापर्यंत होऊ शकते. मधुमेहग्रस्त सुमारे तीन प्रौढांपैकी एक आणि उच्च रक्तदाब असलेल्या पाचपैकी एका प्रौढ व्यक्तीस मूत्रपिंडाचा त्रास होऊ शकतो.

डोळे : उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांतील दृष्टिपटलाला (रेटिना) हानी पोहोचून आपल्या दृष्टिक्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Web Title: Dr Rutuparn Shinde Writes Invisible Risk Of High Blood Pressure

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top