‘पॉवर’ पॉइंट : ओझं...संवेदनशीलतेचं!

‘तिला सांगू नकोस हे, तिला फार वाईट वाटेल. ती जरा या गोष्टींच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे..’ ही वाक्यं अगदी कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये, कुठल्याही प्रसंगात, कुणाबद्दल तरी आपण बोलत असतो.
‘पॉवर’ पॉइंट : ओझं...संवेदनशीलतेचं!

‘तिला सांगू नकोस हे, तिला फार वाईट वाटेल. ती जरा या गोष्टींच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे..’ ही वाक्यं अगदी कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये, कुठल्याही प्रसंगात, कुणाबद्दल तरी आपण बोलत असतो. एखादी गोष्ट झाली तर दुसऱ्याला काय वाटेल, याचा आपण विचार करणं, त्याप्रमाणे आपलं वागणं बदलणं, ही झाली समोरच्याप्रती आत्मीयता, किंवा सहानुभूती.. पण मला राहूनराहून असं वाटतं, की सहानुभूती दाखवणं आणि समोरच्याची सेनेसेटिव्हीटी आपल्या डोक्यावर घेणं, यात फरक आहे. माझ्या मनात हा विषय खूप दिवसांपासून घोळत होता; पण नेमका मांडावा कसा कळत नव्हतं.

‘मी एकंदरीतच खूप सेन्सिटिव्ह आहे,’ हे स्वत:ला माहीत असणं बरोबर आहे; पण ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही माहीत असावं आणि तिनं आपल्याशी बोलताना, वागताना सतत त्याचं भान ठेवावं, हा अट्टाहास फार विचित्र वाटतो. कदाचित अनेकांना हे पटणार नाही. अनेक जण म्हणतील, ‘असं कसं, आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण पूर्ण माहीत असतो. म्हणून तर आपण त्या व्यक्तीला आपली ‘जवळची’ म्हणतो ना. मग त्याच्यासमोर नाही तर कुणासमोर दाखवणार माझी सेन्सेटिव्हिटी..’

माझ्या मते, काहीही गरज नाहीये स्वतःच्या सेन्सिटिव्हीचं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर थोपवायची. आधी यातून मिळणारं प्रेम कधी सहानुभूतीमध्ये बदलतं आणि कधी अपेक्षेच्या दडपणात गुदमरतं हे एकमेकांना कळतंही नाही. मला आतून जे वाटतं, मी किती इमोशनल होते, हे व्यक्त करण्यासाठी प्रत्येकवेळी समोर व्यक्तीच बसवण्याची काय गरज आहे? चित्रकला, संगीत, स्वयपाक, नृत्य, लिखाण अशा किती तरी कलांमधून माझी सेन्सिटिव्हीटी एक्सप्रेस होऊ शकतेच की. आणि तेव्हा ती समोरच्याला जाणवत असेल तर यापेक्षा वेगळं ‘ऐकून घेणं’ ते काय पाहिजे?

‘ती लगेच रडायला लागेल, तो फार मनावर घेईल, तिला खूप राग येईल, त्याला ते आवडणार नाही,’’ अशी प्रेशर डोक्यात ठेवून कित्येक जण नाती अक्षरश: पुढे रेटत असतात. पुरुषांच्या बाबतीत अनेकदा याला ‘इगो जपणं’ ही शेड असते; पण अशा नात्यांना मग काही अर्थ नसतो. ‘जवळचं’ या नावाखाली फुलवलेलं नातं आधी ‘समजून घ्यावं’ ते ‘समजून घ्यायलाच हवं’ इथपर्यंत पोचू न देण्याची जबाबदारी, दोघांपैकी अधिक सेन्सिटिव्ह जो असेल त्याची आहे असं मला वाटतं.

मी रडतीये मला सांभाळ, मी चिडलीये माझं ऐक, मला वाईट वाटलंय तू अमुक अमुक कर... हे असं मूड सांभाळत बसणं, स्वभाव सांभाळत बसणं, एकमेकांसाठी आयुष्यभर करता येऊ शकत नाही आणि करूही नये. तुम्हाला अनेकांना वाटेल की हे माझ्या अनुभवातून लिहिलंय की काय! पण बिलिव्ह मी, माझ्या स्वभावाचा माझ्या जवळच्या व्यक्तींना ताण येणार नाही यासाठी मी स्वत:हून प्रयत्न करत असते.

घाबरून, तणाव घेत कुणी कुणासाठी काही गोष्ट का कराव्यात? जी नाती एकमेकांचे ताण न घेता टिकलेली असतात त्या नात्यात कंटाळवाणेपणाही नसतो. ‘मला समजून घेणारं कुणीतरी पाहिजे’ असल्या सो कॉल्ड ‘रोमँटिक’ अपेक्षा समोच्याला ताण देणाऱ्या ठरू नयेत एवढंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com